पिंपरी – तानाजीनगर, चिंचवड येथील रस्ता आणि पदपथ यादरम्यान असलेल्या पेव्हींग ब्लॉकची उंची रस्त्याच्या उंचीपेक्षा खाली गेली. यामुळे नागरिकांना वाहने पार्क करताना अडचण होते. याबाबतचे वृत्त दै. प्रभातच्या मंगळवारच्या अंकात प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने बुधवारी त्वरीत पेव्हींग ब्लॉकची उंची वाढविण्याचे काम हाती घेतले.
“चिंचवडमधील अर्धवट कामांचा नागरिकांना त्रास’ या शिर्षकाखाली दै. “प्रभात’मधील मंगळवारच्या (दि. 29) अंकात वृत्त प्रसिद्ध झाले. डांबरीकरण करताना पूर्वीचे डांबर खरडून काढणे आवश्यक असते. मात्र, नवीन डांबरीकरण करताना असे करण्यात आलेले नाही. त्यामुळे प्रत्येकवेळी रस्त्याची उंची वाढत चालली आहे. यामुळे पदपथालगत असलेल्या पेव्हिंग ब्लॉकची उंची कमी होत आहे.
पदपथालगत दुचाकी पार्क करताना वाहनचालकांना त्रास सहन करावा लागतो. तसेच येथे निर्माण झालेल्या खड्ड्यातून दुचाकी बाहेर जोरात ओढताना एखादा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याबाबत सविस्तर वृत्त प्रसिद्ध झाले. त्यानंतर बुधवारी प्रशासनाने येथील पेव्हींग ब्लॉक काढून त्याखाली भर घातली. पुन्हा पेव्हींग ब्लॉक बसविण्यात आले. यामुळे आता रस्त आणि पेव्हींग ब्लॉक यांची उंची समान झाली आहे. यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.