पुणे – करोना प्रतिबंधक लसीकरणासाठी आवश्यक लसींचा साठा उपलब्ध होत असल्यामुळे पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात लसीकरणाचा वेग आला आहे. मागील दोन आठवड्यांपासून हा वेग आणखी वाढला असून,
पंधरा दिवसांत तब्बल 3 लाख 20 हजार जणांना लस देण्यात आली आहे. तर आतापर्यंत एकूण 17 लाख 794 लाभार्थ्यांना लस देण्यात आली असून, त्यामध्ये 12 लाख 97 हजार 897 लाभार्थ्यांनी पहिला डोस घेतला. तर 4 लाख 2 हजार 879 लाभार्थ्यांचे लसीचे दोन्ही डोस पूर्ण झाले आहेत.
मागील एक महिन्यातील लसीकरणाची परिस्थिती पाहिली तर, 9 जूनला ग्रामीणमध्ये 11 लाख 72 हजार 748 लाभार्थ्यांचे लसीकरण पूर्ण झाले होते. लसीचा पुरेसा साठा उपलब्ध होत नसल्यामुळे 16 जूनपर्यंत केवल 34 हजार 397 लाभार्थ्यांचे लसीकरण झाले.
मात्र, त्यानंतर लसीचा पुरवठा हळूहळू सुरळीत होण्यास सुरवात झाल्यावर 16 ते 23 जून दरम्यान, 1 लाख 73 हजार 371 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. 23 ते 30 जून दरम्यान 1 लाख 90 हजार 491 तर 1 ते 7 जुलै या आठवड्यात 1 लाख 30 हजार लाभार्थ्यांना लस देण्यात आली आहे.
महिन्याभरात 9 जून ते 7 जुलै पर्यंत एकूण 5 लाख 28 हजार 309 लाभार्थ्यांचे लसीकरण झाले. त्यामध्ये मागील पंधरा दिवसात सर्वाधिक 3 लाख 20 हजार लाभार्थ्यांना लस देण्यात आली.