2,484 करोनाचे ऍक्टिव्ह रुग्ण
50 जणांची प्रकृती गंभीर
64% कारोबाधितांचा रिकव्हरी रेट
पुणे – देशभरात जून आणि जुलै महिन्यात करोना रुग्णांचा उद्रेक होईल, अशी शक्यता वैद्यकीय तज्ज्ञांकडून वर्तविली जात आहे. पण, जूनच्या सुरुवातीलाच पुणेकरांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. शहरातील एकूण करोना बाधितांपैकी बरे होणाऱ्यांची संख्या 64 टक्क्यांवर गेली आहे. तर, मृत्यूदरही 5.12 वरून 4.96 टक्के झाला आहे. तर, एकूण बाधितांच्या 34 टक्के जण उपचार घेत आहेत.
शहरात करोना बाधितांची संख्या वाढत असतानाच दुसऱ्या बाजूला उपचार घेऊन बरे होणाऱ्यांचा आकडाही वाढत आहे. आरोग्य यंत्रणेवरील ताण काही प्रमाणात कमी झाला आहे.
5,019 जणांना डिस्चार्ज
मागील तीन महिन्यांत शहरात एकूण रुग्णांचा आकडा 7,881 झाला आहे. त्यातील तब्बल 5,019 जणांना घरी सोडले आहे. हे प्रमाण सरासरी 66 टक्क्यांवर आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दि. 15 मे रोजीच हेच रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 52.7 टक्के होते. तर मृत्यूचे प्रमाण 5.6 टक्के, तर रुग्णालयात प्रत्यक्ष उपचार घेणाऱ्यांचे प्रमाण हे 42 टक्के होते.