कर्जत (प्रतिनिधी) -ठेकेदारांनी सादर केलेले अवास्तव बील काढण्यास नकार दिल्याने महावितरणच्या अधिकाऱ्यास धमकी तसेच ब्लॅकमेल करण्यात आले. कर्जतमध्ये ही घटना घडली असून याप्रकरणी उपकार्यकारी अभियंता यांनी दोन ठेकेदारांविरुद्ध कर्जत पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.
लोणी मसदपूर शिवारात स्पेक्ट्रम इलक्ट्रिकल कंपनीने नवीन लाईन व रोहित्र टाकण्याचे काम केले होते. या कामाचे बील या कंपनीच्या संबंधित ठेकेदारांनी महावितरणचे उपकार्यकारी अभियंता यांच्याकडे सादर केले होते. पण हे बील प्रत्यक्ष झालेल्या कामापेक्षा जादा आहे, ही बाब महावितरणचे उपकार्यकारी अभियंता अशोक घुले यांच्या लक्षात आली.
झालेल्या कामापेक्षा जादा बील मंजुरीसाठी सादर केले होते. हे बील मंजूर करण्यास घुले यांनी नकार दिला. त्यामुळे कंपनीचे ठेकेदार अक्षय प्रकाश काळे व सुरज तुळशीराम कांबळे यांनी उपकार्यकारी अभियंता घुले यांच्या व्हॉट्सपवर इतर ठिकाणी झालेल्या कामाचे फोटो टाकले. या कामाचे काय आहे ते सांगा? अन्यथा तुमची तक्रार वरिष्ठांकडे करु असे म्हणून माझ्यावर दबाव आणला. मला दमदाटी केली असे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी अक्षय काळे (रा.जवळा, ता. जामखेड), सुरज सिताराम कांबळे या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.