वाई : पसरणी (ता. वाई) येथील क्वारंटाइन सेंटरमध्ये दहा दिवसांपूर्वी दाखल करण्यात आलेल्या 75 वर्षांच्या वृद्धाचा रविवारी दुपारी 1 च्या सुमारास मृत्यू झाला. ही व्यक्ती मुंबईतून पत्नीसमवेत गावी आली होती. त्याच्या घशातील स्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून कोव्हिडच्या नियमानुसार त्यांच्यावर वाईत अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे पसरणी गावात प्रचंड घबराट पसरली आहे.
वाई तालुक्याच्या पश्चिम भागातील अनेक गावांमध्ये करोनाचे रुग्ण सापडत असल्याने ग्रामस्थांची झोप उडाली आहे. लॉकडाऊनमधील नियमांच्या काटेकोर अंमलबजावणीमुळे गेले अडीच महिने पसरणीत एकही रुग्ण आढळला नव्हता. संशयित मृत व्यक्ती 28 मे रोजी मुंबईतील दादर येथून पत्नी, मुलगी व जावयासमवेत खासगी गाडीने आपल्या गावी आली होती.
प्रशासनाने व स्थानिक करोना दक्षता कमिटीने या सर्वांना गावाबाहेर करोना सेंटरमध्ये क्वारंटाइन केले होते. त्याच्या दुसऱ्याच दिवशी संशयिताची मुलगी व जावई मुंबईला परत निघून गेला होता. संशयित वृद्धास उच्च रक्तदाब व मधुमेहाचा त्रास होता. त्यांना रविवारी सकाळी अचानक त्रास होऊ लागला. त्यानंतर दुपारी 1 च्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. स्थानिक कमिटीने ही बाब तातडीने प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर प्रशासनाच्यावतीने कोव्हिडच्या प्रक्रियेनुसार त्यांचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला.
संपूर्ण क्वारंटाइन सेंटरचे निर्जंतुकीकरण करण्यात आले. वाईच्या ग्रामीण रुग्णालयात मृताच्या घशातील स्राव घेऊन त्यांच्यावर वाईतील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. गेल्या दोन-तीन दिवसांत वाई तालुक्यात एकही नवीन करोनाबाधित रुग्ण न आढळल्याने प्रशासनाला दिलासा मिळाला होता; परंतु पसरणीतील वृद्धाच्या संशयास्पद मृत्यूमुळे आरोग्य विभाग व प्रशासन खडबडून जागे झाले आहे.