नवी दिल्ली: जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार करोना व्हायरसवरील प्रभावी औषधाचं आता भारतातच उत्पादन होणार आहे. एवढंच नाही तर त्याची विक्रीही करता येणार आहे. त्या औषधाचं नाव आहे रेमडेसिवीर.
भारताच्या औषधी महानियंत्रक विभागाने या रेमडेसिवीर औषधाच्या उत्पादनासाठी हेटेरो आणि सिप्ला या दोन कंपन्यांना परवानगी दिली आहे. त्यामुळे देशातील करोनाबाधित रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जे करोना पॉझिटिव्ह रुग्ण दाखल आहेत केवळ त्यांच्यासाठी हे रेमडेसिवीर औषध वापरण्यात येणार आहे. यासाठी त्याचं उत्पादन आणि विक्री यासाठी हेटेरो आणि सिप्ला या औषध् कंपन्यांना उत्पादन करण्याची परवानगी देण्यात आली आहे. या औषधाच्या उत्पादनासाठी अन्य तीन औषध कंपन्यांनीही परवानगी देण्यासाठी अर्ज केला होता.
तसेच भारतीय औषध महानियंत्रक संस्थेने फेविपिरावीर या औषधाच्या उत्पादन आणि वितरणासाठी ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स या कंपनीला परवानगी दिली आहे. करोना संसर्गावर अशा प्रकारे मंजुरी मिळालेले हे पहिलेच औषध ठरले होते. आता त्यानंतर रेमडेसिवीर या औषधाच्या उत्पादनासाठीही परवानगी मिळाली आहे.
दरम्यान, रेमडेसिवीर हे औषध महाराष्ट्र सरकारलाही हवे होते. त्यासाठी बांगलादेशातून त्याची आयात करण्यात येणार होती. मात्र, काही कारणास्तव ही आयात थांबवण्यात आली आहे. आता भारतातच त्याचे उत्पादन होणार असल्याने करोना रुग्णांसाठी ही बाब दिलासा देणारी आहे.