कर्जत – कर्जत तालुक्यात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रचाराच्या तोफा कडाडल्या असून या निवडणुकीत अनपेक्षित घडामोडी घडल्या आहेत. त्यामुळे तालुक्याचे राजकीय समिकरणे देखील बदलली आहे. सध्या प्रचाराची रणधुमाळी सुरू असून या निवडणुकीत बाजी कोण मारणार अश्या चर्चा रंगू लागल्या आहेत. आमदार राम शिंदे यांनी राष्ट्रवादीला दिलेल्या धक्क्यातून राष्ट्रवादी सावरली नाही. त्यामुळे या निवडणुकीत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार हे बॅकफुटवर गेल्याची चर्चा आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष काकासाहेब तापकीर यांनी पक्षाच्या विरोधी भूमिका घेत आ. शिंदे यांच्या मंडळामधून उमेदवारी केली आहे. पक्षाने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे, मात्र या कारवाईला उत्तर देताना तापकीर यांनी म्हटले आहे की, गेल्या वेळेस पण आम्ही आ. शिंदे यांच्या बरोबर होतो आणि या वेळेस पण आहोत. सहकारामध्ये पक्षाच्या चिन्हावर निवडणूक होत नसते. त्यामुळे पक्षाच्या विरोधात काम केले असे होत नाही. तापकीर यांना आपल्या मंडळामध्ये घेऊन आ. रोहित पवारांना आ. शिंदेंनी धक्का दिला.
जिल्हा बॅंकेचे संचालक विखे समर्थक अंबादास पिसाळ हे तिसरी आघाडी करतील अश्या चर्चा तालुक्यात रंगत होत्या. मात्र या चर्चांना देखील आ. शिंदेंनी पूर्णविराम देऊन अंबादास पिसाळ यांची नाराजी दूर केली. त्याचबरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे तालुकाप्रमुख बळीराम यादव, शिवसेनेचे तालुकाप्रमुख बापूसाहेब नेटके यांच्यासह मित्रपक्षांची मोट बांधत आ. शिंदे या निवडणुकीत उतरले आहेत.
आ. शिंदे यांच्या मंडळामध्ये तालुक्याच्या सहकारातील दिग्गज अंबादास पिसाळ, काकासाहेब तापकीर, बळीराम यादव, प्रवीण घुले, बापूसाहेब नेटके ही मंडळी असल्याने त्यांच्या मंडळाचे पारडे जड असल्याचे बोलले जात आहे. शिवसेना उद्धव ठाकरे राज्यात महाविकास आघाडीमध्ये असताना कर्जत तालुक्यात मात्र बळीराम यादव यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी आ. शिंदे यांच्या मंडळामध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला.
महाविकास आघाडीत तालुक्यात मिळत असलेली दुय्यम वागणूक त्यामुळे उद्धव ठाकरे गट कायम नाराज राहिलेला आहे. तशी तक्रार देखील त्यांनी वरिष्ठांकडे वेळोवेळी केलेली आहे. त्यामुळे या नाराजी नाट्याचा आ. पवार यांना फटका बसू शकतो हे नाकारता येणार नाही. तसेच प्रवीण घुले यांनी महाविकास आघाडीत असलेल्या कॉंग्रेसला राम राम ठोकत काही दिवसांपूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे. त्याबरोबर भाजपापसून दूरावलेले काही कार्यकर्ते देखील आता आ. शिंदे यांच्याकडे आल्याने आ. शिंदे यांची ताकद वाढत आहे. त्याचा फटका आ. पवार यांना बसण्याची शक्यता आहे.
आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कृषी उत्पन्न बाजार समितीची ही निवडणूक आ. शिंदे आणि आ. पवार यांच्यासाठी प्रतिष्ठेची मानली जात आहे. त्यामुळे दोघांचेही निवडणुकीवर बारीक लक्ष असून या निवडणुकीत कोण बाजी मारतोय हे येत्या काही दिवसात समोर येणार आहे.