जामखेड – जामखेड बाजार समितीचे उपसभापतीपद देखील भाजपला मिळणार असा विश्वास होता. मात्र, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि खासदार सुजय विखे पाटील यांनी विरोधात काम केले. ही गोष्टी वरिष्ठांच्या कानावर घालणार आहे. विधानसभेतही विखेंनी विरोधात काम केले होते. आताही विरोधात काम केले. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार रोहित पवार आणि सुजय विखेंमध्ये छुपी युती असल्याचे त्यातून स्पष्ट झाले आहे, असा गंभीर आरोप आमदार प्रा. राम शिंदे यांनी मंगळवारी केला. त्यावेळी आमचा पक्ष भाजप आहे, कॉंग्रेस नाही, असा टोलाही त्यांनी विखे पाटील यांना लगावला आहे.
आ.शिंदे म्हणाले, विखे पितापुत्रांना खासदार, आमदार, मंत्री केले, पालकमंत्री केले, राज्याच्या मंत्री मंडळात दोन नंबरचे स्थान दिले आता आणखी काय हवे? कार्यकर्त्यांच्या निवडणूकीत अशा पध्दतीने व्यवहार करणे गैर आहे. याबाबत नेतृत्वाच्या कानावर हा विषय घातला व पुन्हा घालीन. कार्यकर्त्यांना जर अशा अडचणी सातत्याने येत असतील तर गंभीर विषय आहे. भविष्यात पक्षाला गंभीर परिणाम भोगावे लागतील, असे उद्गीग्न होऊन आ. शिंदे चोंडी येथे पत्रकारांशी बोलतांना विखे पितापुत्रावर तोफ डागली.
बाजार समितीचे सभापतीपद आमच्याकडेचे येईल असा विश्वास होता, मात्र, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि खासदार सुजय विखे पाटील यांनी विरोधात काम केले. ईश्वर चिठ्ठी आमच्या बाजूने निघाली व भाजपचा सभापती झाला. पण उपसभापतीपद राष्ट्रवादीला गेले. मागील दोन महिन्यांपासून ते आम्हाला सहकार्य करू म्हणाले. अखेर दिवशी तसेच बोलले पण त्यांनी शब्द फिरवला. भाजपमध्ये अशा पध्दतीला थारा नाही, आ. शिंदे म्हणाले. विधानसभा निवडणुकीतही विखेंनी विरोधात काम केले. पुन्हा जुळवून घेतले जाईल असे वाटले होते, पण त्यांनी कर्जत नगरपंचायत निवडणूकीत अपेक्षित सहकार्य केले नाही.
बाजार समिती निवडणूकीत त्यांनी विरोधी काम करून दाखवून दिले की राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्याबरोबर एकत्र असल्याचे त्यांनी दाखवून दिले आहे. जिल्ह्यातील अनेक लोकप्रतिनिधी सांगतात की ते ज्या पक्षात असतात. त्या पक्षाच्या विरोधात ते काम करतात. भाजपमध्ये अशा वर्तनाला थारा नाही.