कोपरगाव – राज्याच्या अर्थसंकल्पात कोपरगाव विधानसभा मतदार संघासाठी जवळपास 552 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. ही मतदारसंघाच्या दृष्टीने अभिमानास्पद बाब असून, आ. आशुतोष काळे यांच्या धडपडीमुळे हे सर्व शक्य झाले आहे. याचे पारंपरिक विरोधकांकडूनदेखील अप्रत्यक्षपणे स्वागत करण्यात आले आहे.
तालुक्यातून राज्याच्या तिजोरीत हजारो कोटीचा महसूल जातो. त्या बदल्यात राज्य सरकारकडून मतदारसंघाच्या विकासाला जास्तीत जास्त निधी कसा मिळविता येईल यासाठी आ. काळे यांनी मागील तीन वर्षांत जवळपास 1200 कोटींपेक्षा जास्त निधी मतदारसंघाच्या विकासासाठी आणून रस्ते, वीज, पाणी, आरोग्य आदी विकासाचे प्रश्न मार्गी लावले आहेत.
सन 2023-24च्या अर्थसंकल्पात मतदार संघासाठी तब्बल साडेपाचशे कोटींचा निधी मंजूर करण्यात आ. काळे यांनी यश मिळविले आहे. यामध्ये माजी आ. अशोकराव काळे यांच्या कार्यकाळात काकडी येथे उभारण्यात आलेल्या विमानतळावर सर्व सुविधांयुक्त नवीन प्रवासी टर्मिनल उभारण्यासाठी 527 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. रस्त्यांसाठी 25.50 कोटी निधी दिला आहे.
या निधीतून रा. मा. 65 अंजनापूर ते रांजणगाव देशमुख रस्ता (5 कोटी), चास-वडगाव-बक्तरपूर जिल्हा हद्द रस्ता (कोपरगाव ते धारणगाव रस्ता) सुधारणा करणे (4 कोटी), रा. मा. 7 धामोरी, येसगाव रस्ता येसगाव-खिर्डी गणेश-बोलकी रस्ता सुधारणा करणे (4 कोटी), बक्तरपूर जिल्हा हद्द रस्ता (मंजूर गाव ते बक्तरपूर रस्ता) सुधारणा करणे (2.50 कोटी), कुंभारी येथील गोदावरी नदीवरील मोठ्या पुलाची दुरुस्ती करणे (03 कोटी), उक्कडगाव रस्ता (करंजी फाटा ते कॅनॉल पर्यंत रस्ता) सुधारणा करणे (2.50 कोटी), शिंगवे ते बनकर वस्ती रस्ता सुधारणा करणे (2.50 कोटी), रामपूरवाडी ते पुणतांबा रस्ता (प्रजिमा 87) मध्ये सुधारणा करणे (2 कोटी) या रस्त्यांचा समावेश आहे. लवकरच या निधीतून प्रत्यक्ष कामास सुरुवात होणार आहे.