कोरेगाव सातारा लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार शशिकांत शिंदे यांच्या विजयासाठी जीवाचे रान करण्याचा निर्धार निष्ठावंत व जुन्याजाणत्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी शनिवारी सकाळी केला. या निवडणुकीतून शशिकांत शिंदे यांना कोणत्याही परिस्थितीत खासदार म्हणून दिल्लीत पाठविण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.
आ. शशिकांत शिंदे यांचा जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी सकाळी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर नियोजन करण्यासाठी शनिवारी सकाळी ल्हासुर्णे येथील निवासस्थानी इंडिया आघाडीसह महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची महत्वपूर्ण बैठक झाली.
बैठकीस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शविला. आ. शशिकांत शिंदे यांच्या स्वाभिमानाच्या लढाईत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जीवाचे रान करण्याचा संकल्प केला. यावेळी प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय कार्यकर्त्यांच्या भूमिका जाणून घेण्यात आल्या. कार्यकर्त्यांनी आग्रही मते मांडली. ही अस्तित्वाची लढाई असून शरद पवार यांचे हात बळकट करण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत कार्यकर्त्यांनी ठाम भूमिका घेणे आवश्यक असल्याचे शशिकांत शिंदे यांनी सांगितले.