फलटण – शेरेचीवाडी येथील कार्यक्रमप्रसंगी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर बोलत होते. जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या ऍड. सौ. जिजामाला नाईक निंबाळकर, भाजप जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे, युवा नेते अभिजित नाईक निंबाळकर, पंचायत समितीचे माजी सदस्य दिलीप पवार, भाजप तालुकाध्यक्ष बजरंग गावडे, गटनेते अशोक जाधव, शहराध्यक्ष अमोल सस्ते, युवा मोर्चाचे सुशांत निंबाळकर, माजी नगरसेवक सचिन अहिवळे, भाजप नेते तुकाराम शिंदे, सरचिटणीस संतोष सावंत, अमित रणवरे, युवा नेते माउली चव्हाण, शेखर चव्हाण, नाना मोहिते, प्रमोद शिंदे उपस्थित होते.
खा. रणजितसिंह म्हणाले, तालुक्यातील जनतेने मला निवडून देऊन काम करण्याची संधी दिली आहे. त्याचे सोने करण्याचा प्रयत्न करत आहे; परंतु तालुक्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते मला अडकवण्याचा प्रयत्न करत आहेत. मी काही कच्च्या गुरुचा चेला नाही. लढवय्या हिंदुरावांचा मी मुलगा आहे. असे अनेक प्रसंग आमच्या कुटुंबाने सहन केले आहेत. कोणाला तरी उभे करून खोट्या केसेसमध्ये अडकवून मला दाबण्याचा प्रयत्न करू नका.
खुमखुमी असेल तर लोकसभेला समोर या. यापुढे माझ्या नादाला लागू नका. जशास तसे उत्तर लवकरच मिळेल. मी विकासकामात राजकारण आणत नाही. मी व्यक्तिगत कधीही कोणाला त्रास देत नाही. आजपर्यंत राजे गटाच्या कार्यकर्त्यांना खोट्या केसेसमध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला नाही; परंतु कोणाला तरी सांगून माझ्या कार्यकर्त्यांना केसेसमध्ये अडकवण्याचा प्रयत्न सुरू आहे; परंतु याद राखा, माझ्या कार्यकर्त्याच्या केसाला जरी धक्का लावाल, तर हा रणजितसिंह छातीचा कोट करून समोर उभा राहिला. प्रसंगी खासदारकी पणाला लावेल. विकासकामांसाठी मला कधीही मदत मागा, मी ती करेन. यापुढे तालुक्यात विकासचे पर्व सुरू होईल. जनतेने भाजपच्या पाठीशी राहावे.
ऍड. सौ. जिजामाला म्हणाल्या, तालुक्यातील युवकांना नोकरी, व्यवसायासाठी मदत करायला तयार आहोत. कारखान्याच्या माध्यमातून या भागातील शेतकऱ्यांच्या विकासात आम्ही कुठेही कमी पडणार नाही. जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे म्हणाले, तालुक्याच्या विकासासाठी खा. रणजितसिंह यांनी कोट्यवधींचा निधी दिला आहे.
घाणेरडे राजकारण करण्यापेक्षा समोर येऊन लढा. हिम्मत असेल तर लोकसभेला माझ्याविरुद्ध निवडणूक लढवून दाखवा, असा इशारा खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी ना. रामराजे यांचे नाव न घेता दिला.