महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आक्रमक, निषेध रॅलीतून व्यक्त केला संताप
वाठार स्टेशन – कर्नाटक नवनिर्माण सेनेचे भीमाशंकर पाटील व माजी मंत्री बसवराज कोरडे यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाचा सोमवारी वाठारस्टेशन येथे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी निषेध केला. यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी येडियुरप्पा यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करत परिसरातून निषेध रॅली काढली.
अधिक माहिती अशी, कर्नाटक नवनिर्माण सेनेच्या भीमाशंकर पाटील व माजी मंत्री बसवराज कोरडे यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे राज्यभर पडसाद उमटले. सोमवारी वाठार स्टेशन येथेही महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी बाजार चौकातून रॅली काढत कर्नाटक सरकारचा निषेध केला, तसेच त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कन्नडीगाना जशास तसे उत्तर देऊ, असा इशारा दिला. दरम्यान, कर्नाटक सरकारच्या विरोधात काल कोल्हापूर सांगलीसह साताऱ्यातील जोरदार निदर्शने करण्यात आली.
दरम्यान, महाराष्ट्र कर्नाटक सीमा वादाचे पडसाद ग्रामीण भागातही उमटले, कर्नाटक नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल वादग्रस्त विधान करून त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले होते. त्यामुळे शिवसैनिक तसेच महाआघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये उद्रेक निर्माण झाला होता. त्याचाच परिणाम वाठार स्टेशन येथील कार्यकर्त्यांनी येडियुरप्पाचा पुतळा जाळून निषेध व्यक्त केला आहे.
सदरच्या या निषेध रॅलीमध्ये फलटण कोरेगाव शिवसेना विधानसभा क्षेत्र प्रमुख अमोल आवळे, कॉंग्रेसचे पं. स. सदस्य संजय माने, राष्ट्रवादीचे माजी उपसरपंच संजय भोईटे, शिवसेनेचे युवा नेते मा. ग्रामपंचायत सदस्य इरफान पठाण, विशाल जाधव, निसारभाई मोमीन, मानसिंगराव नलवडे, हसनभाई शेख तसेच ग्रामपंचायतीचे आजी-माजी सदस्य व महा विकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.