पुणे – जिल्ह्यातील कोविड परिस्थितीत सुधारणा होत असून लसीकरणाचे प्रमाणदेखील चांगले आहे. त्यामुळे पुणे, पिंपरी-चिंचवड व ग्रामीण भागातील महाविद्यालये आणि पर्यटनस्थळे सोमवारपासून (दि.11) सुरू करण्यात येणार आहे. ज्या विद्यार्थ्यांचे लसीकरणाचे दोन डोस पूर्ण झाले आहेत, त्यानांच प्रवेश मिळणार आहे. बाहेर जिल्ह्यांतून येणाऱ्या विद्यार्थ्यांना आरटी-पीसीआर चाचणी करणे बंधनकारक राहणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी सांगितले.
विधानभवन येथे करोना आढावा बैठकीनंतर पवार बोलत होते. ते म्हणाले, “जिल्ह्यात लसीकरणाला चांगली गती देण्यात आली आहे. लसीकरणात पुणे जिल्हा राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे. कोविड संसर्गाचे प्रमाणदेखील नियंत्रणात असल्याने सोमवारपासून महाविद्यालये सुरू करण्यात यावीत. लसीच्या दोन डोस घेतलेल्या विद्यार्थ्यांनाच महाविद्यालय परिसरात प्रवेश देण्यात यावा. महाविद्यालय व्यवस्थापनाने कोरोना मार्गदर्शक सूचनांचे पालन होईल याकडे कटाक्षाने लक्ष द्यावे.’
बैठकीतील निर्णय
– पर्यटनस्थळे सोमवारपासून सुरू
– करोना प्रतिबंधक नियम पाळणे बंधनकारक
– हॉटेल रात्री 11 वाजेपर्यंत सुरू राहणार
– खासगी कार्यालयांमध्ये 100 टक्के उपस्थितीत परवानगी
– राज्य आणि केंद्र सरकारच्या अखत्यारितील प्रशिक्षण केंद्र सुरू
सिनेमागृहांना लवकरच परवानगी
नाट्यगृहे व सिनेमागृहे 50 टक्के क्षमतेने सुरू करण्याचे संकेत उपमुख्यमंत्री पवार यांनी दिले असून, याबाबतचा निर्णय दि.22 ऑक्टोबर रोजी घेण्यात येणार आहे.