सोलापूर – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सोलापूर दौऱ्यात कॉंग्रेसला धक्का बसला आहे. कॉंग्रेसच्या माजी महापौर नलिनी चंदेले आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे कौटुंबिक संबंध असलेले व निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे कॉंग्रेसचे माजी शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांनी कॉंग्रेसला हात दाखवत हातावर घड्याळ बांधले आहे.
यामुळे आगामी सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीला काही महिने अवधी असतानाच कॉंग्रेसला धक्का बसला आहे. नलिनी चंदेले आणि सुधीर खरटमल यांच्यासह जवळपास 34 जणांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. यामध्ये बहुतांश कॉंग्रेस पक्षातील माजी नगरसेवक तसेच पदाधिकारी यांचा समावेश आहे.
सुधीर खरटमल अचानकपणे राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या व्यासपीठावर आल्यामुळे अनेकांना धक्का बसला. सुधीर खरटमल हे सुशीलकुमार शिंदे यांचे अत्यंत विश्वासू व्यक्तिमत्व मानले जात. सुरुवातीपासून ते सुशीलकुमार शिंदे यांचे कट्टर कार्यकर्ते म्हणून कामकाज पाहत होते.
दरम्यान, सोलापूर महापालिकेत भाजपला धक्का देण्यासाठी महेश कोठे यांच्याकडून पहिल्या टप्प्यात कॉंग्रेस आणि एमआयएम यांच्यातील बड्या नेत्यांना राष्ट्रवादीत प्रवेश देण्यात येत आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेतील निम्मी नगरसेवक महेश कोठे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीत प्रवेश करण्यासाठी उत्सुक आहेत.