नवी दिल्ली – कोळसा चोरी घोटाळा प्रकरणात तृणमूल कॉंग्रेसचे नेते आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी यांना अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजावले आहेत. शुक्रवारी सकाळी कोलकाता येथील ईडीच्या कार्यालयात हजर राहण्याचे आदेश बॅनर्जी यांना देण्यात आले आहेत.
अभिषेक यांची मेहुणी मेनका गंभीर यांनाही याच प्रकरणात 5 सप्टेंबर रोजी चौकशीसाठी बोलावले आहे. अभिषेक यांना रविवारीच नोटीस पाठवण्यात आली असून त्यांची चौकशी करण्यासाठी दिल्लीहून ईडीचे अधिकारी येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. मेनका गंभीर यांचे लंडन येथील बॅंकेत खाते असून या खात्यातून बरेच व्यवहार केले आहेत. त्याची चौकशी केली जाणार आहे. दरम्यान, कालच एका कार्यक्रमात ममता यांनी भारतीय जनता पार्टीवर निशाणा साधला होता.
आपल्या भाच्याला लवकरच ईडीची नोटीस येण्याची शक्यता त्याचवेळी त्यांनी वर्तवली होती. कोळसा चोरी घोटाळ्यात या अगोदर केंद्रीय अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयने अभिषेक यांची पत्नी रजिरा बॅनर्जी, त्यांची मेहुणी मेनका गंभीर, त्यांचा पती आणि सासरे या सगळयांची चौकशी केली आहे. हा खूप मोठा घोटाळा असल्याचे अगोदरच सांगण्यात आले आहे. (Coal scam: ED summons CM Mamata Banerjee’s nephew Abhishek Banerjee)