मुंबई, – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रकृती ठणठणीत आहे. ते लवकरच ऍक्शन मोडमध्ये दिसतील. विरोधकांचे काम आरोप-प्रत्यारोप करणे आणि जनतेला भरकटवणं आहे. तिकडे लक्ष देण्याची गरज नाही, असा टोला पर्यावरण मंत्री आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी विरोधकांना लगावला आहे.
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीनिमित्त अभिवानद केल्यानंतर माध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरे यांनी हे विधान केले. विरोधी पक्षाकडे न देणेच योग्य आहे. ते काही ना काही आरोप-प्रत्यारोप करत असतात. लोकांची इमेज खराब करत असतात. जनतेला भरकटवत असतात. आपल्या कामावर आपण फोकस केलेला बरा. कालपरवा जो सर्व्हे आला त्यात मुख्यमंत्री टॉप फाईव्हमध्ये आहेत आणि जनता जनार्दन मुख्यमंत्र्यासोबत आणि आमच्या सोबत ठाम उभे आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ठणठणीत आहेत. संध्याकाळी ते दिसतील. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लवकरच ऍक्शनमोडमध्ये दिसतील. करोनाची साथ अजून गेली नाही. सर्वांनी काळजी घ्या. केसेस वाढत आहेत, असेही त्यांनी सांगितले.
सर्वांसाठी आज महत्त्वाचा दिवस आहे. शिवसेना प्रमुखांकडून आम्ही स्फूर्ती घेऊन काम करत राहू, असे सांगतानाच बाळासाहेबांची आठवण म्हणून ट्विटरवर फोटो टाकला, असे त्यांनी सांगितले.
शाळा सुरू होणार असे असले तरी पालकांना वाटत असेल तरच त्यांनी मुलांना शाळेत पाठवावे. विद्यार्थ्यांना शाळेत पाठवायचे की नाही हे पालक आणि शाळेने ठरवायचं आहे, असे ते म्हणाले.