- सर्वाधिक रुंदीचा बोगदा
- शून्य अपघात मार्ग बनविण्याचा प्रयत्न
वडगाव मावळ – द्रुतगती मार्गावरील तीव्र उतार व घाटामुळे होणारे अपघात टाळून शून्य अपघात रस्ता बनविण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या मिसिंग लिंक प्रकल्पाची आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाहणी केली. मिसिंग लिंक प्रकल्प 13.30 किलोमीटरचा असून या प्रकल्पाच्या कामाचा आढावा त्यांनी घेतला.
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील खोपोली ते कुसगाव या नवीन मार्गिकेच्या बांधकामाच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. त्यानंतर प्रकल्प कॅम्प कार्यालयात सुरू असलेल्या बांधकामाच्या कामाचा दर्जा आणि गुणवत्तेची माहिती जाणून घेतली. मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील खोपोली ते कुसगाव दरम्यान मिसिंग लिंक प्रकल्पांतर्गत खालापूर टोल नाका ते लोणावळा (सिंहगड संस्था) पर्यंत मुंबई पुणे द्रुतगती मार्गाची क्षमता वाढ करणे प्रस्तावित आहे.
यावेळी नगरविकास व सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, ऊर्जामंत्री नितीन राऊत, परिवहन मंत्री अनिल परब, खासदार श्रीरंग बारणे, आमदार सुनील शेळके, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांच्यासह संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांनी खोपोली ते कुसगाव नवीन मार्गिकेच्या बांधकामाची माहिती दिली.
असा आहे प्रकल्प
या प्रकल्पाची एकूण लांबी 19.80 कि.मी. असून या प्रकल्पांतर्गत खालापूर ते खोपोली इंटरचेंज या अस्तित्वातील 5.86 कि.मी. लांबीच्या रस्त्याचे 8 पदरीकरण करणे. खोपोली एक्झिट ते कुसगांव (सिंहगड संस्था) या भागातील 13.3 कि. मी. राहिलेल्या लांबीमध्ये दोन बोगदे व दोन व्हायाडक्ट बांधणे. खोपोली एक्झिट ते कुसगाव (सिंहगड संस्था) या लांबीमध्ये 8 पदरी 2 बोगद्यांसह नवीन रस्ता करणे. बोगदा क्र. 1- 1.75 कि.मी. लांबीचे दोन समांतर बोगदे, बोगदा क्र.2 – 8.92 कि.मी. लांबीचे दोन समांतर बोगदे.
बोगद्यांची रुंदी 21.45 मीटर असून भारतातील सर्वात जास्त रुंदीचा बोगदा असणार आहे. मुंबई व पुणे कडे जाणारे दोन्ही बोगदे दर 300 मीटर अंतरावर एकमेकांस क्रॉस पॅसेजव्दारे जोडण्यात येत आहेत. अस्तित्वातील द्रुतगती मार्गाचे आठ पदरी रुंदीकरण 5.86 किलोमीटर करण्यात येणार आहे. डिसेंबर 2022 मध्ये या प्रकल्पाचे काम पूर्ण होणार आहे. अशी माहिती एमएसआरडीसी कार्यकारी अभियंता राकेश सोनवणे यांनी दिली. या प्रकल्पाची एकूण किंमत 6695.37 कोटी रुपये इतकी आहे.
प्रकल्पाची गरज
आडोशी बोगद्याजवळ मुंबई पुणे द्रुतगती मार्ग (6 लेन) व राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 (4 लेन) एकत्र येतात व खंडाळा एक्झिट येथे वेगळे होतात. आडोशी बोगदा ते खंडाळा एक्झिट या लांबीत घाट व चढ उताराचे प्रमाण जास्त असून दरडी कोसळण्याचे प्रकार पावसाळ्यात वारंवार होत असतात, त्यामुळे मुंबईकडे येणारी डोंगरालगतची एक लेन ही पावसाळ्यात वाहतुकीसाठी बंद ठेवावी लागत असल्यामुळे वाहतूक कोंडी होते. या प्रकल्पामुळे सध्याचे खोपोली एक्झिट ते सिंहगड संस्था हे 19 कि.मी.चे अंतर 6 कि.मी.ने कमी होऊन 13.3 कि.मी. इतके होईल व प्रवासाच्या वेळेत 20 ते 25 मिनिटांची बचत होण्यास मदत होणार आहे.
प्रकल्प बांधकाम सद्यस्थिती
बोगदा क्र. 2 एक्झिटच्या दोन समांतर बोगद्यांपैकी उजव्या बोगद्याचे 1979 मीटर (मुंबईकडे) खोदकाम पूर्ण झाले असून डाव्या बोगद्याचे 1552 मीटर (पुणेकडे) खोदकाम पूर्ण झाले आहे.
बोगदा क्र. 2 ला जोडणाऱ्या अडिट नंबर 1 चे 1340 मीटर इतके खोदकाम पूर्ण झाले असून नंबर 2 चे 1153 मीटर इतके खोदकाम पूर्ण झाले आहे. बोगदा क्र. 1 च्या पोर्टल पर्यंत पोहोचण्यासाठीच्या पोचरस्त्याचे काम सध्या प्रगती पथावर आहे. सध्याच्या मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर खालापूर टोलनाका ते खोपोली एक्झिटचे 8 पदरीकरण करण्याचे काम प्रगती पथावर आहे. या 8 पदरीकरणांतर्गत येणाऱ्या मेजर ब्रिज नं. 1. 2 व 3 या तीनही पुलांचे रुंदीकरणाचे काम प्रगती पथावर आहे. तसेच व्हायाडक्ट क्र. 1 च्या पायाभरणीचे काम देखील प्रगती पथावर आहे. व्हायाडक्ट क्र. 2 च्या आखणीपर्यंत पोचवण्यासाठीच्या पोचरस्त्यासाठी इतर काम पूर्ण झाले असून पोचरस्ता बांधकाम सद्यस्थितीत प्रगती पथावर आहे.