सोशल क्लब्समधील सदस्यांची उपस्थिती निम्म्यावर घटल्याचे चित्र
पुणे – शहरात उच्चभ्रू नागरिक आणि कॉर्पोरेट वर्कर्ससाठी शुक्रवार ते रविवार म्हणजे वीकेंड डेज असता. एखाद्या क्लब अथवा रेस्टॉरंटमध्ये जायचे, मित्र-मैत्रिणींना भेटून मारलेल्या गप्पा, विविध चवींचे जेवण करत मजा करायची हा ठरलेला बेत असतो. मात्र, “करोना’च्या प्रादुर्भावाने नागरिकांच्या या “सोशलाइजिंग’वरही चांगलाच परिणाम केला असून, पुण्यातील अनेक सोशल क्लब्समधील नागरिकांची उपस्थिती तब्बल 50 ते 60 टक्क्यांनी कमी झाल्याचे दिसून येते.
शहरात अनेक ठिकाणी क्लब आहेत. येथे नागरिक एकमेकांना भेटत, गप्पा आणि जेवणाचा आनंद लुटतात. विशेषत: शनिवारी आणि रविवारी तर हे क्लब विविध “सोशल इव्हेंट्स’ नी बहरलेले असतात. अनेकदा नागरिक आपल्या आवर्जून येथे सुट्टीचा दिवस “सेलिब्रेट’ करतात. मात्र, गेल्या एक-दोन आठवड्यांपासून करोनाच्या पार्श्वभूमीवर क्लबमध्ये येणाऱ्यांच्या संख्येत मोठी घट झाली आहे.
अनेक ठिकाणी क्लबमध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविल्या जात आहे. याबाबत प्रिती देवनानी म्हणाल्या, “क्लबमध्ये जाण्यापूर्वी नागरिकांना सॅनिटायझरने हात स्वच्छ करण्याची सूचना देण्यात येते. येथील कर्मचारी मास्क लावून काम करतात. संपूर्ण परिसराच्या स्वच्छतेबाबत अधिक काळजी घेतली जात आहे. या विषाणूचा प्रादूर्भाव होऊ नये, यासाठी विशेष खबरदारी घेतली जात आहे,’ असेही त्यांनी म्हटले आहे.
शहरातील विविध क्लब्स, रेस्टॉरंटमध्ये नागरिकांची गर्दी चांगलीच कमी झाली असल्याचे दिसून येते. विविध खबरदारीच्या उपाययोजना केल्या जात असल्या, तरी जवळपास 60 टक्के नागरिक हे बाहेर येण्याऐवजी घरी राहणेच पसंत करत आहेत. साहजिकच याचा परिणाम विविध सोशल इव्हेंटसवरही होत आहे.
– प्रिती देवनानी, सोशल क्लब सदस्य
करोनाबाबत सद्यस्थिती पाहता, अनेकांनी खबरदारी घेत, घरी राहण्याला पसंती दिली आहे. आम्हीदेखील आमचे सर्व सामाजिक कार्यक्रम रद्द केले आहेत. नातेवाईकांव्यतिरिक्त इतरांना काही दिवस घरी न येण्याबाबत विनंतीदेखील केली आहे. यामुळे सामाजिक आणि आर्थिक नुकसान होत आहेत. मात्र, आरोग्यासाठी हे महत्त्वाचे असल्याने आपण हे केलेच पाहिजे.
– सबा पूनावाला, सोशल क्लब सदस्य