सातवाहनकालीन अंबा – अंबिका लेणी परिसरात युवकांचे श्रमदान
जुन्नर – जुन्नर शहराजवळील सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी कोरलेल्या अंबा-अंबिका लेण्या व परिसराची स्वच्छता होत आहे. जुन्नर तालुक्याला पर्यटन दर्जा मिळूनही या सातवाहनकालीन लेण्यांकडे पुरातन विभागाचे दुर्लक्ष असल्यामुळे तालुक्यातील काही लेणीप्रेमी युवक येथे स्वच्छता मोहीम राबवित आहेत.30 युवकांनी पाण्याच्या टाक्या, बौद्ध स्तूप, लेण्या व परिसर, अवघड मार्गाची स्वच्छता केली आहे.
जुन्नरजवळील खानापूर गावाच्या हद्दीतील मानमोडी डोंगरावर कोरलेल्या लेणी शृंखलेमध्ये बौद्ध विहार, चैत्यगृह, पाण्याची कुंडे आदी 33 खोदकामे दिसून येतात.
अंबा-अंबिका व भूत लेणींच्या परिसरात मधमाशांची मोठी पोळी आहे. अनेकदा त्यांनी पर्यटकांना चावा घेतल्याच्या घटना घडल्या आहेत. याबाबत सूचना देणारे फलक येथे असावेत, कुठल्याही लेण्यांना सुरक्षा व्यवस्था नसल्याची खंत युवकांनी व्यक्त केली आहे.
हजारो वर्षांपूर्वीची भिंतींवर कोरलेली रंगीत कलाकृती नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. लेण्यांमध्ये बौद्ध भिक्खुंचे अनेक वर्षे वास्तव्य असल्याचे पुरावे आढळतात. या ठिकाणी जैनांचे प्रथम तीर्थकर व जैन देवता अंबिकेची मूर्ती असल्याचा उल्लेख अनेक जैन ग्रंथांत आढळतो.
याप्रसंगी युवकांनी लेण्यांतील टाक्या साफ करून लेणींच्या भिंतीवर लिहलेली नावे पुसण्याचे काम केले. लेणीच्या आवारातील कचरा साफ करून मार्गावर दगडी पायऱ्या बनवायचे काम सुरू केले आले.
यावेळी लेणी अभ्यासक सिद्धार्थ कसबे, प्रीतम करंदीकर, गणेश वाव्हळ, विकास वाव्हळ, उमेश वाघमारे, किरण दारोळे, पंकज खरात, शेखर डबडे, बाळा वाव्हळ, अक्षय वाव्हळ, गणेश सोनवणे, संदीप ऊबाळे, देवेंद्र इंगळे, अजिंक्य कुलकर्णी आदी तरूण श्रमदानासाठी
उपस्थित होते.
1996 पासून लेण्याद्री येथे लेणी दर्शन या नावाखाली प्रवेश शुल्क आकारले जाते. तेथे पुरातन विभागाचे कार्यालय असून याठिकाणी विविध विकासकामे करण्यात आली आहेत. मात्र, याच परिसरातील तुळजाई व अंबा-अंबिका लेणी समूह याठिकाणी मात्र पुरातन विभागाकडून विकास कामे होताना दिसत नाहीत.
– अतुल भोसेकर,
लेणी अभ्यासक, नाशिक.