कराड -मलकापूर शहरामध्ये करोना विषाणू बाधित संख्या 25 इतकी आहे. त्यापैकी 6 रुग्ण बरे झाले आहेत. करोनाचा प्रादुर्भाव वाढू नये व त्यावर नियंत्रण यावे याकरिता पुणे विभागाचे आयुक्त दिपक म्हैसेकर, यांनी नुकीतच अहिल्यानगर विभागास भेट दिली. त्यावेळी दिलेल्या सुचनेनुसार मलकापूर नगरपरिषद हद्दीतील प्रत्येक घरातील व्यक्तींची स्वतंत्रपणे तपासणीसाठी 108 – थर्मल स्कॅनल मिटर व 104- ऑक्सीमिटर उपलब्ध करुन दिले आहेत. त्याद्वारे घरोघरी जाऊन तपासणी मोहीम सुरू असून नागरिकांनी तपासणी यंत्रणेला सहकार्य करावे, असे आवाहन मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांनी केले आहे.
या उपकरणांद्वारे अंगणवाडी सेविका, जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षिका, आशा सेविका, प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी व नगरपरिषदेचे कर्मचारी असे एकूण 104 कर्मचारी व 13 नोडल अधिकारी यांच्यामार्फत तपासणी करण्यात येत आहे. दि. 16 मे पर्यंत ही तपासणी पूर्ण करण्यात येणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले. ते म्हणाले, मलकापूर शहर करोनाबाधित झाल्याने पुणे आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी प्रादुर्भाव असलेल्या ठिकाणांची पाहणी केली. त्यांच्यासोबत जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते हेही उपस्थित होते.
मलकापूर परिसरात करोनाचा आणखी प्रादुर्भाव वाढू नये यासाठी कडक उपाययोजना करण्याच्या दृष्टीने शहरातील नागरिकांची आरोग्य तपासणी करण्याचे निर्देश त्यांनी दिले होते. जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत थर्मलस्कॅनल मीटर व पल्स ऑक्सीमिटर उपलब्ध करुन देण्यात आलेली आहेत. त्यानुसार प्रत्येक कर्मचाऱ्यामार्फत प्रती दिन 15 कुटुंबे अशी दरदिवशी 1 हजार 530 अशी एकूण शनिवारपर्यंत 10 हाजार 970 कुटुंबातील व्यक्तींच्या शरीरातील तापमान, रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण (एसपीओ 2) व ह्रदयाचे ठोके यांची तपासणी करण्यात येणार आहे.
मलकापूर नगरपरिषदेने अंगणवाडी सेविका, प्राथमिक शिक्षक व नगरपरिषद कर्मचारी यांच्यामार्फत दि. 10 मार्च, पासून शहरातील नागरिकांची आरोग्याबाबतची माहिती संकलित केलेली आहे. तसेच परदेशातून आलेले 15 व परराज्यातून आलेल्या 709 नागरिकांना होम क्वारंटाइन करुन त्यांच्यावर लक्ष केंद्रित केले होते. तथापि, मलकापूर नगरपरिषद हद्दीत करोना बाधित रुग्ण आढळून आल्याने याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. या तपासणीमुळे मलकापूर नगरपरिषद हद्दीतील नागरिकांच्या आरोग्याचा बेसिक डेटाबेस नगरपरिषदेकडे उपलब्ध होणार आहे. याद्वारे भविष्यात नगरपरिषदेस नागरिकांच्या आरोग्याबाबत आणखी उपाययोजना करणे सोईचे जाणार असल्याचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांनी सांगितले.
शहरातील दैनंदिन नागरिकांची होणाऱ्या तपासणीचा अहवाल आरोग्य विभागामार्फत तपासण्यात येत आहे. यामध्ये काही अडचणी आढळून आल्यास त्यावर तात्काळ उपचार करणे शक्य होणार आहे. मलकापूर नगरपरिषदेने घेतलेल्या निर्णयामुळे नागरिकांचा ताण कमी झालेला आहे. तसेच करोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखणे व त्यावर नियंत्रण ठेवणे शक्य झाले आहे. तथापि, नागरिकांनी तपासणी यंत्रणेला सहकार्य करुन आपली तपासणी करुन घ्यावी, असे आवाहन केले आहे.