पिंपरी – कोविडच्या पार्श्वभूमीवर कोजागिरी पौर्णिमेसाठी महापालिकेने शहरातील सर्व उद्याने बंद ठेवल्याने नागरिकांनी यंदा उद्यानांमध्ये कोजागिरी पौणिमा साजरी न करता घराच्या टेरेसवरच चंद्रदर्शन घेऊन कोजागिरी साजरी केली. अनलॉकमध्येदेखील कोजागिरीवर करोनाचे सावट दिसून आले.
दसरा आणि दिवाळीदरम्यान येणारी कोजागिरी पौर्णिमा ही खास मित्रमंडळी जमवून गप्पांच्या साथीने रात्र जागविण्याचे एक चांगले निमित्त असते. कोजागिरी पौर्णिमेचा उत्सव म्हणजे रात्री दुधात चंद्राचे प्रतिबिंब पाहून त्याचा नैवेद्य दाखविणे आणि मग ते दूध पिणे. चंद्र हा शीतल आणि आल्हाददायक गोष्टींचे प्रतीक असल्याने त्याची पूजा करणाऱ्यांनाही चंद्रासारखी शीतलता मिळते असे मानले जाते. या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वांत जवळ, म्हणजे कोजागिरी पर्वतालगत आलेला असतो. त्यामुळे या पौर्णिमेला कोजागरी पौर्णिमा म्हटले जाते.
शहरात महापालिकेची 45 उद्याने असून, या उद्यानांमध्ये कोजागिरी पौर्णिमा साजरी करण्यासाठी दैनंदिन वेळेव्यतिरिक्त रात्री बारा वाजेपर्यंत नागरिकांसाठी ही उद्याने खुली असतात. मात्र यंदा करोनामुळे धार्मिक सण, उत्सव,महोत्सव साजरे करण्यावर निर्बंध लादण्यात आले आहेत.
अनलॉकमध्ये काही दिवसांपूर्वी ज्येष्ठ व नागरिक लहान मुलांना वगळून इतर नागरिकांसाठी जॉगिंगसाठी सकाळी व सायंकाळी ठराविक वेळेत ही उद्याने खुली करून देण्यात आली आहेत. मात्र, नागरिक मोठ्या संख्येने एकत्र येण्यास निर्बंध असल्याने कोजागिरीसाठी यंदा ही उद्याने नागरिकांसाठी बंदच ठेवण्याचा निर्णय महापालिकेच्या उद्यान विभागाने घेतला आहे. त्यामुळे यंदा सर्वांनी कुटुंबीयांसोबत कोजागिरी घरीच साजरी केली.