पिंपरी -राज्यासह पिंपरी-चिंचवड शहरातील करोनाची तिसरी लाट ओसरली आहे. त्यामुळे राज्य सरकारने मास्क सक्ती हटविली आहे. दुसरीकडे करोनाच्या संभावित लाटेपासून सुरक्षा देणाऱ्या प्रिकॉशन डोसकडे मात्र नागरिकांनी पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे.
करोनाच्या दुसऱ्या लाटेत करोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत होते. त्यावेळी नागरिकांनी खासगी रुग्णालयात जाऊन सातशे ते बाराशे रुपयांची लसही मोठ्या प्रमाणात घेतली होती. परंतु आता पालिकेच्या रुग्णालयातील निशुल्क आणि खासगी रुग्णालयात अवघ्या सव्वा दोनशे रुपयांना उपलब्ध असणाऱ्या प्रिकॉशन डोस घेण्यास नागरिक तयार नसल्याचे दिसून येत आहे.
पिंपरी- चिंचवड शहरात आत्तापर्यंत 3 लाख 59 हजार 372 नागरिकांना करोनाची लागण झाली आहे.
तर 4 हजार 624 नागरिकांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. शहरात जानेवारी 2021 पासून कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाला सुरूवात झाली. शहरात आतापर्यंत पहिला आणि दुसरा डोस मिळून 35 लाख 46 हजार 349 इतके लसीकरण झाले आहे. सद्यस्थितीत करोनाची तिसरी लाट ओसरली असल्यामुळे नागरिक कोविड प्रतिबंधात्मक प्रिकॉशन डोस घेण्याकडे दुर्लक्ष करत आहेत.
शहरात 18 ते 45 वयोगटातील फक्त 384 नागरिकांनी तर 45 ते 59 वयोगटातील 867 जणांनीच “प्रिकॉशन” डोस घेतला आहे. तसेच 14 हजार 692 हेल्थ केअर वर्कस आणि फ्रंटलाइन वर्कर यांनी “प्रिकॉशन” डोस घेतला आहे. 60 वर्षावरील 45 हजार 435 नागरिकांनी “प्रिकॉशन” डोस घेतला आहे.