पुणे – समलैंगिक, ट्रान्सजेंडर व्यक्ती या समाजाचा भाग आहेत. स्वातंत्र्य आणि आदर आपण सर्वांच्या लैंगिकतेसंदर्भात द्यायला हवे, असे मत “एलजीबीटीक्यूआय’ समुदायासाठी काम करणारे जमीर कांबळे यांनी मांडले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इतिहास विभागात “एलजीबीटीक्यूआय: दुर्लक्ष, द्वेष, दयाबुद्धी की दोस्ती?’ या नावानं मुक्त चर्चेचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी कांबळे यांनी विद्यार्थी, प्राध्यापक आणि संशोधकांच्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली.
समलैंगिकता वा पारलैंगिकता या प्राणिसृष्टीपासून मानवापर्यंत सर्वांमध्ये आढळतात. व्यक्तींनी एकमेकांना समान मोकळीक द्यायची, तर एकमेकांच्या स्वातंत्र्याचा आदर करायला हवा. आणि आपल्याला एकमेकांसोबत बांधून ठेवणारे बंधुतेचे धागे असतील तरच हा आदर करावा असं वाटेल, असेही कांबळे यांनी सांगितले.
समाजात जशा व्यक्ती तितक्या प्रकृती आढळतात. त्याचप्रमाणे “एलजीबीटीक्यूआय’ व्यक्तींमध्येही सर्व प्रकारची माणसे असतात. कोणत्याही समूहात संपूर्ण सद्गुणी किंवा संपूर्ण दुर्गुणी अशी माणसं नसतात, तर त्यांच्या परिस्थितीनुसार त्यांची वागणुकीची निवड कधी योग्य किंवा अयोग्य ठरते. सर्व व्यक्तींना मोकळेपणानं आपण आहोत, तसंच व्यक्त होण्याची मुभा असेल, तर अनेक प्रकारचा अन्याय आणि कोंडमारा टाळता येतो, अशी अपेक्षाही कांबळे यांनी व्यक्त केली.
इतिहास विभागप्रमुख डॉ. श्रद्धा कुंभोजकर यांनी प्रास्तविक केले. प्रा. बाबासाहेब दूधभाते म्हणाले, “चर्चांच्या माध्यमातून व्यक्ती, कुटुंबं
आणि समाजात खुलं वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी विद्यापीठासारख्या शैक्षणिक संस्थांनी उचलावी. तेव्हाच आपण खऱ्या अर्थानं सर्वसमावेशक समाज होऊ.’