पैशाची बॅग हिसकावताच सिनेस्टाईल चाकूहल्ला

श्रीगोंदा (प्रतिनिधी) – विसापूर फाटा येथे गुरुवारी (दि. 20) दुपारी चार जणांची चाकूने सपासप वार करत हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली. पूर्ववैमनस्यातून हे खून झाल्याची फिर्याद बेलवंडी पोलिसांत दाखल झाली. तथापि, 24 तास उलटण्याच्या आतच तपासाने वेगळे वळण घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. स्वस्तातील सोने घेण्यासाठी बाहेरगावाहून आलेल्या एका व्यक्तीच्या हातातील पैशांची बॅंग हिसकावली गेली. ही लूट होत असल्याचे लक्षात आल्याने त्या एकाच व्यक्तीने चार जणांवर चाकूहल्ला केला. त्यात चौघाजणांचा जागीच खात्मा झाल्याचे प्रत्यक्षदर्शिंनी सांगितले.

याबाबत सविस्तर माहिती अशी, जिल्ह्याबाहेरील काही व्यक्ती दोन महिलांसह एका वाहनातून विसापूरफाटा येथे स्वस्तातील सोने घेण्यासाठी आले होते. यात आपली फसवणुकही होवू शकते, अशी शक्‍यता सोने खरेदीसाठी आलेल्यांना आधीच असावी. त्यामुळे पैशांच्या बॅगेसोबत त्या एकाच व्यक्तीने बॅगेमागे हातात चाकू लपविला होता. दरम्यान, लुटीच्या प्लॅननुसार पैशाची बॅग दिसली की ती लगेच हिसकावली गेली. मात्र, पूर्ण सावध असलेल्या त्या व्यक्तिने पैशांची बॅंग हिसकावणाऱ्यावर चाकूने सपासप वार सुरु केले.

अचानक व अनपेक्षितपणे झालेल्या हल्ल्याने लुटमार करणारा गोंधळून ओरडत राहिला. त्याचवेळी तेथे जवळच दबा धरुन बसलेल्या अन्य काहींनी स्वस्तात सोने घेण्यासाठी आलेल्या त्या हल्लेखोर व्यक्तिच्या दिशेने धाव घेतली. मात्र, सोने खरेदीसाठी आलेल्या त्या व्यक्तिने सर्वांवरच सपासप चाकूने वार केले. त्यात चौघांचाही जागीच मृत्यू झाला. त्यावेळी गोंधळलेले अन्य काहीजण तेथून पळून गेले. त्याचवेळी सोने खरेदीसाठी आलेल्यांनीही आपल्या वाहनातून पोबारा केल्याचे काहींचे म्हणणे आहे. तथापि, रात्री उशिरा त्या संदर्भात पूर्ववैमनस्यातून व भांडणातून ही घटना घडल्याची फिर्याद दाखल झाल्याने तपासाची दिशाच गोंधळली होती.

पोलिसांना या संदर्भात रात्री उशिराने धागेदोरे मिळाले. त्यामुळे दाखल झालेली मुळ फिर्याद व प्रत्यक्ष घटनाक्रमाचा पोलीस शोध घेत आहेत. जिल्हा पोलिस अधीक्षक अखिलेश सिंह रात्रीपासूनच बेलवंडी पोलिस ठाण्यात तळ ठोकून आहेत. तपासाची सूत्रेही त्यांनी स्वत:कडेच घेतली असल्याचे पोलीसांनी सांगितले. दरम्यान, काल दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास झालेल्या या घटनेप्रकरणी मयताच्या आईने तिच्या सख्ख्या भावाच्या दोन मुलांविरुध्द बेलवंडी पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यात अक्षय उंबऱ्या काळे, मिथुन उंबऱ्या काळे व इतर चार ते पाच अनोळखी व्यक्तींनी नाथीक कुंज्या चव्हाण, श्रीधर चव्हाण, नागेश चव्हाण व लिंब्या हावऱ्या काळे यांचा खून केल्याचे म्हटले आहे. पोलिसांनी फिर्यादीनूसार गुन्हा दाखल केला आहे. मात्र, प्राप्त झालेल्या माहितीनूसार परजिल्ह्यांत तपासाची दिशा ठेवली आहे.

विसापूर फाटा येथे काल घडलेले “ते’ हत्याकांड स्वस्तातील सोन्याचे अमिष दाखवून लुटण्याचा प्रकार असावा, अशी शक्‍यता आहे. पोलीस पथकाने त्या दृष्टीनेच तपासही सुरु केलेला आहे. तथापि, अजून काहीच धागेदोरे हाती लागलेले नाहीत.
अरविंद माने, पोलीस निरिक्षक, बेलवंडी पोलीस ठाणे

श्रीगोंद्यात स्वस्तातील सोने लूट नवीन नाही…!
“स्वस्तातील सोन्याचे अमिष दाखवून लुटले’, अशा घटना श्रीगोंदे तालुक्‍यात नवीन नाहीत. यापूर्वी अनेकदा अशा घटना घडल्या. तथापि, त्यातून बोध घेऊन पुढचे शहाणे होत नाहीत. कालही स्वस्तातील सोने घेण्यासाठी नोटांनी भरलेली बॅग घेऊन काही जण आले होते, असे सांगितले जाते. ठरलेल्या व्यवहारात पैसे देवून सोने घेण्याचे ठरले होते. मात्र, यावेळी घेणारे जास्त सावध होते. आपण फसले जावू शकतो याची शक्‍यता त्यांना आधीच होती. त्यामुळे तेही तयारीत होते. पैसे घेवून सोने देण्यासाठी काही व्यक्ती समोर आले आणि इतर दबा धरुन बसले होते. पैशाची बॅग दिसली की ती हातातून हिसकावली आणि पळू लागले. त्याचवेळी सोने घेण्यासाठी आलेल्या एकाच व्यक्तीने हातात लपवून ठेवलेला चाकू बाहेर काढत बॅग हिसकावणारावर सपासप वार केले. तो ओरडल्याने लपून बसलेले समोर आले. मात्र, चाकूधारीने सिनेस्टाईल सर्वांनाच घायाळ केले. सर्वांचा खात्मा होत असल्याचे पाहून बाकीचे पळून गेले. श्रीगोंद्यातील गुन्हेगारीला ही भयनक चपराक मानली जाते. लुटमार करणाऱ्यांचाच बळी गेल्याची ही पहिलीच घटना असल्याचे सांगितले जात आहे

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.