मुंबई – शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष, माजी आमदार विनायक मेटे यांचा अपघाती मृत्यू झाला होता. या अपघातानंतर त्यांना एक तास वैद्यकीय मदत न मिळाल्याचा आरोप करण्यात आला असून अपघताबाबतही संशय उपस्थित करण्यात आल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मेटे यांच्या मृत्यूची सीआयडी चौकशी करण्याचे निर्देश पोलीस महासंचालकाना दिले.
विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी अपघाताच्या त्या दोन तासात काय झाले? याची चौकशी केली पाहिजे, अशी मागणी केली होती. अशातच सोशल मीडियावर एक ऑडिओ क्लिप व्हायरल केली जात आहे. या ऑडिओ क्लिपमधील आवाज विनायक मेटेंच्या अपघातापूर्वी त्यांच्यासोबत असलेले आणि त्यांचे निकटवर्तीय अण्णासाहेब मायकर यांचा असल्याचा दावा केला जात आहे. त्यानंतर मेटे यांच्या अपघाती मृत्यूची राज्य सरकारकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे.
मराठा समाजाचे नेते अशी ओळख असलेल्या विनायक मेटे यांच्या वाहनाला 14 ऑगस्ट रोजी पहाटे पाच वाजता मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात झाला होता. या अपघातात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी तातडीने नवी मुंबईतील एम जी एम रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली होती. त्यावेळीच प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी या मृत्यची सखोल चौकशी करण्यात येईल, असे जाहीर केले होते.
त्यानुसार आज त्यांनी राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांना या मृत्यूची सीआयडी चौकशी करून आपला निष्कर्ष सादर करण्याचे आदेश दिलेले आहेत.