मुंबई – गोरेगाव येथील पत्राचाळ पुनर्वसन घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आज मुंबईत काही ठिकाणी पुन्हा छापेमारी केली. या घोटाळ्याप्रकरणात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना अलीकडेच अटक केली आहे.
यापूर्वी ईडीने 2 ऑगस्टला या प्रकरणाशी संबंधित मुंबईतील दोन ठिकाणी छापे टाकले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या परिसरामध्ये हाऊसिंग डेव्हलपमेंट इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड (एचडीआयएल) या फर्मसाठी रोख व्यवहार करणाऱ्या व्यक्तीचे निवासस्थान आणि कंपनीशी संबंधित आणखी एक परिसराची ईडीने झाडाझडती घेतली.
त्या व्यक्तीला ईडीच्या कार्यालयात नेऊन त्याचा जबाबही नोंदवण्यात आला. तर, दुसऱ्या छाप्यात काही कागदपत्रे हस्तगत करण्यात आली. त्यानंतर आज पुन्हा ईडीने मुंबईत काही ठिकाणी छापेमारी केली.
दरम्यान, पत्राचाळ गैरव्यवहारातून संजय राऊत आणि त्यांच्या कुटुंबीयांना एक कोटींहून अधिक रक्कम मिळाली असल्याचा दावा ईडीने केला आहे.