मुंबई – क्रीस्तोफर नोलनचा आगामी चित्रपट ‘ओपेनहायमर’ 21 जुलै रोजी भारतासह जगभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. बहुचर्चित चित्रपटाची घोषणा झाल्यापासून, चाहते रुपेरी पडद्यावर ही आकर्षक कथा पाहण्यासाठी उतावीळ झाले आहेत. देश-विदेशात पसरलेल्या सिनेप्रेमींच्या या चित्रपटाबद्दलच्या उत्सुकतेचा अंदाज यावरून लावता येतो की, ‘ओपनहायमर’चे ऍडव्हान्स बुकिंग सुरू होताच चित्रपट हाऊसफुल होत आहे. ही स्थिती केवळ परदेशातच दिसून भारतातही ‘ओपेनहायमर’ची तिकिटे मोठ्या प्रमाणात बुक झाली आहेत. मुंबईमध्ये या चित्रपटाचे खास स्क्रिनिंग होणार आहे. या तिकीटाची किंमत ऐकून तुम्हाला धक्का बसेल.
दिग्दर्शक क्रीस्तोफर नोलनचा आतापर्यंतचा सर्वात महत्त्वाकांक्षी चित्रपट म्हणून ओळखला जाणारा, ‘ओपनहायमर’ अवघ्या काही दिवसांत चित्रपटगृहात दाखल होणार आहे. या सिलियन मर्फी स्टारर चित्रपटाचे शो भारतात पहाटे ३ वाजल्यापासून सुरू होतील. पहिल्या शोची तिकीट विक्रीही मोठ्या प्रमाणात सुरू आहे. पहिल्या वीकेंडमध्ये अनेक शो, अगदी पहाटे ३ पासून ते मध्यरात्रीपर्यंतचे शो हाऊसफुल झाले आहेत.
‘ओपनहायमर’च्या तिकिटाच्या किमतीबद्दल बोलायचे झाले तर, बहुतांश तिकिटे खूप महाग आहेत.’ओपनहायमर’चा भारतातील सर्वात महागडा शो मुंबईतच आयोजित केला जात आहे. मुंबईतील लोअर परेल भागातील PVR आयकॉन, फिनिक्स पॅलेडियम येथे रात्री 11 वाजता होणाऱ्या शोसाठी देशातील सर्वात महागड्या ‘ओपेनहायमर’ तिकिटाची किंमत 2 हजार 450 रुपये इतकी आहे.
काय आहे चित्रपटात नेमकं
‘ओपेनहायमर’ हा चित्रपट भौतिकशास्त्रज्ञ जे रॉबर्ट ओपेनहायमर यांच्या जीवनावर आणि शोधांवर आधारित आहे. जे. रॉबर्ट हे अणुबॉम्बचे जनक म्हणून ओळखले जातात. हा चित्रपट पहिला अणुबॉम्ब तयार करण्याचे श्रेय मिळालेल्या भौतिकशास्त्रज्ञाचा उदय आणि पतनाचे वर्णन करतो. याच प्रकल्पांतर्गत दुसऱ्या महायुद्धात प्रथम अण्वस्त्रे तयार करण्यात आली. हिरोशिमा आणि नागासाकीवर टाकण्यात आलेले अणुबॉम्ब, ज्याने जपानमधील जीवन आणि मालमत्तेचा विध्वंस केला, हा त्याचाच एक भाग आहे.
या चित्रपटात अभिनेता सिलियन मर्फी ‘ओपेनहायमर’ची भूमिका साकारणार आहे. तो पहिल्यांदाच क्रीस्तोफर नोलनसोबत चित्रपटात काम करणार आहे. सिलियन मर्फी व्यतिरिक्त, ‘ओपेनहाइमर’ स्टार्स एमिली ब्लंट, मॅट डॅमन, रॉबर्ट डाउनी जूनियर, फ्लोरेन्स पग असे अनेक दर्जेदार कलाकार या चित्रपटात दिसणार आहेत.