चूल आणि मूल “एप्रिल फूल’ (भाग २)

प्रा. शैलेश कुलकर्णी

आपल्या प्रत्येकाला जगण्यापलीकडचं जीवन अधिक आनंद देत असतं. ह्या आनंदात आपण आत्मकेंद्रित झालो, तर मात्र इतरांच्या बाबतीतल्या आपल्या जाणिवाच संपुष्टात येण्याची शक्‍यता असते. आयुष्यात दुसऱ्यांसाठी, खरं तर, करण्यासारखं खूप काही असत; पण आपलंच तिकडे लक्ष नसतं. आनंदातिरेकानं काही वेळा आपल्याला जगाचा, इतरांचा विसर पडतो, पण दु:खाच्या वेळी मात्र प्रत्येकाच्या आठवणी आल्याशिवाय आपला एकही क्षण जात नाही. कोणालाही एखाद्याच्या दु:खापेक्षा सुखात सहभागी व्हायलाच आवडत असतं. सद्य:स्थितीत तर ह्या व्हर्च्युअल जगात रममाण झालेल्या व्यक्ती फेसबुकवरील तुमच्या पोस्टला कदाचित लाईक करतीलही, पण ती पोस्ट शेअर करतीलच असं नाही, अथवा त्यावर कॉमेंट करतीलच असंही नाही. आपणही अनेकदा ट्‌विट करण्याऐवजी क्‍विट करणं अधिक पसंत करतो, योग्य समजतो. का ? काय कारण असू शकेल बरं ? आपापसातील गोष्टी शेअर करण्यातून परस्परांची केअर केल्याची प्रचीती येते, काही वेळा बेअर देखील करावं लागतं; तरच कोणालाही डेअर करताना आश्‍वासक वातावरणाची अनुभूती येत असते. ह्यांपैकी खरंच आपण काय काय करतो? ह्याची गरज नसते का? ह्या सर्वच बाबींची अभ्यासपूर्वक जाणीव करून घेण्याची जरुरी असते.

ती च्या प्रकृतीचा विसर

स्त्रीला खरं तर अबला म्हणण्याची सद्य:स्थितीत आवश्‍यकता नाही. अनेक कारणामुळे ती देखील आता सर्वच पातळ्यांवर पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून स्वतःचं कर्तृत्व जगासमोर सिद्ध करून दाखवत आहे. स्त्रीचं कर्तृत्व, नेतृत्व, वक्तृत्व, दातृत्व आणि मातृत्व तिच्या प्रत्येक विचार, वर्तन आणि व्यवहारांतून स्पष्ट होत असल्याचं जग बघत आहे. तरीही तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन न बदलला जाणे हीच पुरुषांमध्ये उणीव असल्याचं म्हटलं तर काय चुकीचं आहे? “ती” च्या प्रकृतीचा विसर पडल्याचं आपल्यातील सुज्ञ जाणू शकतील. सुज्ञांना झालेल्या जाणिवांमुळे कदाचित समाजात तिच्यावर प्रत्येक गोष्ट लादणे कमी होईल. अनेक समस्या अशा असतात की, त्या तिच्यापुरत्याच मर्यादित असतात, त्या समस्यांवरील उपायांची सुरुवात तिला स्वतःपासूनच करायला लागणं ह्यासारखी दुसरी शोकांतिका नसावी. पुरुष करत असलेल्या अनेक अन्याय, अत्याचारांमुळे तिला आलेला शारीरिक थकवा आणि मानसिक लकवा हा क्षणिक नसतो. तिच्या प्रकृतीचा विसर पडलेले मात्र तिचं शरीर यंत्रासारखं आणि मन मंत्रासारखं कार्यरत राहावं असं अपेक्षित करत असतात. जेव्हा एखाद्या घरांत ज्येष्ठ स्त्रीमध्येच पुरुषी वर्चस्व असतं, तेव्हा त्याचे विपरीत परिणाम त्याच घरातील इतर स्त्रियांना तोंड दाबून बुक्‍क्‍यांचा मार सहन केल्याप्रमाणे उणीव म्हणावी लागेल.

“चूल-मूलच्या विचारांची भूल

पुरुष प्रधान संस्कृतीच्या परंपरेप्रमाणे प्रत्येक स्त्रीला चूल-मूलच्या विचारांमध्येच गुरफटून राहावं लागतं. आपण प्रगतीपथावर असल्याचा आभास निर्माण करून काही निष्पन्न होत नसतं, ह्याची जाणीव होणं महत्वाचं असतं. स्त्री-पुरुष समानता म्हणजे आपापसातील स्पर्धा निश्‍चितच नाही अथवा स्पर्धात्मक बरोबरी देखील नाही. कुटुंबातील सर्वच पातळीवरील निर्णय मग ते शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक अथवा कौटुंबिक कोणतेही असोत, त्या निर्णयांमध्ये स्त्रीचा सहभाग असणं म्हणजेच स्त्री-पुरुष समानता असणं होय. ह्या समानतेत विचार, वर्तन आणि व्यवहार सर्वच बाबी समसमान असणं अभिप्रेत असतं. अर्थात, स्त्रीनं देखील केवळ नोकरी करून, पुरुषांच्या बरोबरीनं सर्व कामे करून, त्यांच्यासारखे कपडे घालून, पार्टीत दारू, सिगारेट सारखी व्यसनं करून समानता येत नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. अनेकांना कोणताही निर्णय घेताना “मी किती शहाणा” हे दाखवून देण्यांत पुरुषार्थ वाटत असतो. “ति” च्या बाबतीत तिचे विचार, वर्तन आणि व्यवहार अभ्यासपूर्वक समजून घेतले पाहिजेत, तिच्या कर्तृत्व आणि नेतृत्वावर विश्‍वास ठेवला पाहिजे. तिच्या केवळ शरीराचाच विचार केला जातो, पण तिच्या मनाला अव्हेरून तिची क्रूर थट्टा केली जाते. परंपरागत स्त्रीला चूल-मूलच्या विचारांची भूल दिली जात असते. एक स्त्रीच दुसऱ्या स्त्रीला त्याची सातत्यानं आठवण आणि जाणीव करून देत असते. का बरं, एखाद्या स्त्रीलाच दुसऱ्या स्त्रीच्या संवेदनांची जाणीव होत नाही? त्या संवेदना सहवेदना का वाटत नाहीत? चूल-मूलच्या विचारांची भूल

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.