मुंबई – देशातील सर्वात मोठी कर्ज देणारी बॅंक असणाऱ्या स्टेट बॅंक ऑफ इंडियाने (Sbi) कर्ज (loan) वसुलीसाठी आणि कर्जाच्या हप्त्याची आठवण कर्जदारांना करून देण्यासाठी एक नवीन फंडा आजमावण्याचे ठरवले आहे. बॅंकेतर्फे अशा कर्जदारांना आता चॉकलेट्सचे पाकीट पाठवून वेळेवर कर्ज फेड करण्याची आठवण करून देणार आहे.
बॅंकेच्या म्हणण्यानुसार, असे आढळून आले आहे की कर्जदार जो कर्ज थकवण्याचा विचार करत आहे तो बॅंकेच्या स्मरणपत्रांना किंवा कॉलला उत्तर देणार नाही. त्यामुळे अघोषितपणे त्यांच्या घरी भेटणे हाच उत्तम मार्ग आहे. बॅंकेच्या वतीने ज्यांनी किरकोळ कर्जे घेतली आहेत. त्यांच्यापैकी अनेकांनी ही कर्जे थकवली आहेत. त्यांच्याकडून कशी कर्जवसुली करायची याचे वेगवेगळे उपाय चर्चिले गेले आहेत. (Chocolates to borrowers Sbi)
गेल्या तिमाहीत स्टेट बॅंकेची थकित कर्जाची रक्कम 16.46 टक्क्यांनी वाढून ती रक्कम आता 12 लाख 4 हजार 279 कोटी रुपयांवर गेली आहे. बॅंकेने आपल्या रिटेल कर्जाच्या वितरणात अलिकडच्या काळात मोठी वाढ केली आहे. त्यामुळे बॅंकेने दिलेल्या एकूण कर्ज रकमेत मोठी वाढ झाली आहे. गृह खरेदी, वाहन अथवा वैयक्तिक स्वरूपांच्या खरेदीसाठी तसेच शैक्षणिक कारणासाठी बॅंकेकडून मोठ्या प्रमाणात कर्ज वितरण केले जाते. (State Bank of india)
कर्जाचे हप्ता थकवणाऱ्याच्या घरी अचानक भेट देऊन त्यांना चॉकलेट्स पाकिट भेट देऊन कर्जदारांना आश्चर्य चकित करण्याचा उपाय प्रभावी ठरू शकतो, असे बॅंकेच्या विभागाचे म्हणणे आहे. सध्या प्रायोगिक तत्वावर हा प्रयोग गेल्या पंधरा दिवसांपासून अनौपचारीकपणे सुरू आहे. तो यशस्वी झाल्यास अधिकृतपणे ही उपाययोजना सर्वत्र राबवली जाईल. आम्ही आमची संकलन कार्यक्षमता सुधारण्यासाठी काही इतर फिनटेकशी देखील बोलत आहोत, असे बॅंकेच्या अधिकाऱ्यांना सांगितले.