सॅन फ्रान्सिस्को: चीनच्या लष्कराशी संबंधित असलेल्या एका चिनी महिला शास्त्रज्ञाला अमेरिकेत अटक करण्यात आली आहे. आपण चीनच्या लष्कराशी संबंधित आहोत ही माहिती तिने व्हीसासाठी अर्ज करताना लपवून ठेवली होती. त्यामुळे तिला व्हिसा फ्रॉडच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे.
जुआन तंग असे या महिलेचे नाव असून ती सेल्युलर बायोलॉजी या विषयात डॉक्टरेट आहे. ती 27 डिसेंबर 2019 मध्ये अमेरिकेत आली होती. कॅलिफोर्निया विद्यापीठात ती संशोधक व प्राध्यापक म्हणून काम करीत होती.
तथापि तिचा चिनी लष्कराशी संबंध होता. तिला गेल्या आठवड्यात अटक करण्यात आली आहे. तंग हिच्या बरोबरच अन्य तीन चिनी शास्त्रज्ञांवरही अशाच स्वरूपाचा आरोप आहे. हे चारही जण चिनी लष्करासाठी काम करीत होते. पण त्यांनी व्हिसा अर्जात ही माहिती लपवून ठेवली होती. या सर्वांना आता अटक करण्यात आली आहे.
आपल्यावर कारवाई होणार असल्याचे लक्षात येताच तंग हिने अमेरिकेतील चिनी दूतावासाचा आश्रय घेतला. पण अधिकारी तिथेही पोहचले त्यावेळी आपल्याला दम्याचा विकार आहे असे सांगून तिने हॉस्पिटल गाठले व अटक टाळण्याचा प्रयत्न केला.पण अखेरीस तिला अटक करण्यात आली आहे. तिच्या घरावर घालण्यात आलेल्या छाप्यांमध्ये जे साहित्त्य सापडले आहे त्यातून ती चिनी लष्करासाठीच काम करीत होती ही बाब स्पष्ट झाली आहे असे अमेरिकेतील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.