पुणे विभागीय आयुक्‍तपदी सौरभ राव

पुणे – पुणे विभागीय आयुक्‍तपदी सौरभ राव यांची नियुक्‍ती करण्यात आली आहे. त्यांनी आपल्या पदाचा पदभार शुक्रवारी स्वीकारला. सध्याचे विभागीय आयुक्‍त डॉ. दीपक म्हैसेकर हे शुक्रवारी सेवानिवृत्त झाले. त्यामुळे यापदी राव यांची नियुक्‍ती करण्यात आली.

विभागीय आयुक्‍त डॉ. म्हैसेकर हे दि.31 जुलै रोजी निवृत्त होत असल्याने यापदी कोणाची नियुक्‍ती होणार याकडे लक्ष लागले होते. मागील 15 दिवसांत राज्य शासनाने विभागीय आयुक्‍त कार्यालयाचे विशेष कार्य अधिकारी म्हणून सौरभ राव यांची नियुक्‍तीचे आदेश काढले. त्यानुसार राव यांनी विभागाचा आढावा घेत डॉ. म्हैसेकर यांच्याबरोबरीने करोना परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी काम केले.
सौरभ राव यांची अपेक्षेप्रमाणे विभागीय आयुक्‍तपदी नियुक्‍ती झाली आहे. राव यांचीच यापदी निवड केली जाणार असल्याची चर्चा मागील दोन महिन्यांपासून सुरू होती. ती चर्चा खरी ठरली आहे.

डॉ. दीपक म्हैसेकर यांच्याकडून मुख्यमंत्री सहायता निधीस मदत
विभागीय आयुक्‍त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी स्वत: मुख्यमंत्री सहायता निधीला 51 हजार रुपयांचा निधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे गुरुवारी सुपूर्त केला. करोना विरुद्धच्या लढ्यात समाजातील सर्व स्तरातील लोकांकडून, सामाजिक संस्थांकडून सरकारला सहकार्य मिळत आहे. परंतु, यात निवृत्त होताना आपला खारीचा वाटा म्हणून डॉ. म्हैसेकर यांनी हा धनादेश मुख्यमंत्र्यांना दिला. डॉ. म्हैसेकर यांनी कोविड उपाययोजनेमध्ये अक्षरश: फ्रंट साइडला योद्‌ध्याचे काम करून ही नेतृत्त्वाची धुरा व्यवस्थित सांभाळली. मुख्यमंत्र्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आणि उत्तम आरोग्याची मनोकामना केली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.