बोधगया (बिहार) – तिबेटचे सर्वोच्च धर्मगुरू दलाई लामा यांची कथित हेरगिरी करणाऱ्या एका चिनी महिलेला बिहार पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या महिलेकडे पोलीस कसून चौकशी करत आहेत, असे बिहारचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (मुख्यालय) जे.एस.गंगवार यांनी वृत्तसंस्थेला सांगितले.
अपहरण झालेल्या बालकाला पोलिसांनी अवघ्या 23 तासांत शोधून काढले
दलाई लामांना कथित धोका निर्माण करण्याच्या प्रकरणी या महिलेला ताब्यात घेण्यात आले आहे. गुरुवारी सकाळी दलाई लामा एका सार्वजनिक कार्यक्रमामध्ये सहभागी होणार होते. त्यापूर्वी गुप्तचरांनी दलाई लामांच्या सुरक्षेबाबत काही खात्रीशीर माहिती दिल्यामुळे पोलीस सतर्क झाले होते. एक चिनी महिला या ठिकाणी उपस्थित असून तिच्या हालचाली संशयास्पद असल्याचे गुप्तचरांनी स्थानिक पोलिसांना कळवले होते.
त्यानंतर या महिलेचे रेखाचित्र तयार करण्यात आले आणि तिचा शोध घ्यायला सुरुवात करण्यात आली. ही महिला गयामध्ये रहात असून तिच्याबाबत संशयास्पद हालचालींची माहिती मिळाली होती, असे गया येथील वरिष्ठ पोलीस अधिक्षक हरप्रीत कौर यांनी सांगितले. या महिलेबाबत गेल्या 2 वर्षांपासून गोपनीय माहिती मिळत होती. म्हणूनच तिचा शोध घेतला गेला, असेही कौर यांनी सांगितले.
ही महिला गेल्या वर्षभरापासून देशाच्या वेगवेगळ्या भगात रहात होती. मात्र अशा चिनी महिलेच्या वास्तव्याबाबत परदेश विभागाकडे कोणतीही नोंद आढळली नाही. दर वर्षीप्रमाणे दलाई लामा बोध गयाच्या भेटीवर आले आहेत. कोविडच्या साथीमुळे गेल्या दोन वर्षात त्यांचा दौरा रद्द करावा लागला होता.