अपहरण झालेल्या बालकाला पोलिसांनी अवघ्या 23 तासांत शोधून काढले

पिंपरी, दि. 29 – सिग्नलवर वस्तू विक्री करणाऱ्या दांपत्याच्या बालकाचे एका महिलेने अपहरण केले. मात्र पिंपरी पोलिसांनी अवघ्या 23 तासांमध्ये या दीड वर्षांच्या बालकाचा शोध घेतला. पिंपरी पोलिसांनी ही कामगिरी केली.
रवी सुनील पवार व राधा पवार हे दाम्पत्य सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथून उदरनिर्वाहासाठी तीन वर्षांपूर्वी पुण्यात आले. ते पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे साहित्य विक्री करीत होते. मंगळवारी (दि. 27) नेहमीप्रमाणे तीन मुलांना सोबत घेऊन वस्तू विक्रीचे करीत होते.
दुपारी सव्वादोन वाजताच्या सुमारास त्याचे वडील हे चौकातील झाडांच्या कुंड्यालगत मुलांना बसवून वडापाव आणण्यासाठी गेले. त्यावेळी पत्नी सिग्नलवर वस्तू विक्री करीत होती. दहा मिनिटांमध्ये वडील परत आले असता त्यांना त्यांचा मुलगा तिथे नसल्याचे लक्षात आले. दोघांनी मिळून परिसरात शोध घेतला असता मुलगा मिळून आला नाही. यामुळे त्यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात धाव घेतली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अवताडे यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने आवश्यक ती कार्यवाही हाती घेतली. पिंपरी पोलीस, अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्ष, गुन्हे शाखा युनिट-2 यांची स्वतंत्र पथकांनी तपासाला सुरवात केली.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये तोंडाला स्कार्फ बांधलेली एक महिला मुलाला घेऊन जाताना दिसून आली. आरोपी महिलेचा माग काढण्यासाठी पोलिसांनी 100 हून अधिक सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. दुसऱ्या दिवशी रात्री आरोपी महिलेने मुलाला शिरगाव येथील प्रतिशिर्डी साईबाबा मंदिरात सोडून दिल्याचे समजले. पिंपरी पोलिसांचे पथक शिरगाव येथे गेले. अपहरण झालेल्या ताब्यात घेवुन फिर्यादीकडे खात्री करून दिले. आरोपी महिलेचा शोध सुरू असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अवताडे यांनी सांगितले.
ही कामगिरी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह आयुक्त मनोज कुमार लोहिया, अपर आयुक्त डॉ. संजय शिंदे, उपायुक्त विवेक पाटील, स्वप्ना गोरे, सहायक आयुक्त प्रेरणा कट्टे, डॉ. प्रशांत अमृतकर यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक शंकर अवताडे, तपास पथकाचे अधिकारी व कर्मचारी तसेच अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षचे पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण, उपनरीक्षक प्रदीपसिंग सिसोदे, गुन्हे शाखा युनिट दोन तसेच शिरगाव पोलीस चौकीचे अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे.
पोलिसांनी अवघ्या 23 तासांत शोधून काढले





