नवी दिल्ली – केंद्र सरकराने संपूर्ण देशातील विविध राज्यांमध्ये आत्तापर्यंत एकूण 129 कोटी डोस वितरित केले आहेत. यात राज्यांनी थेट संपादित केलेल्या डोसचाही समावेश आहे. अजून राज्यांकडे एकूण 21 कोटी 85 लाख डोस शिल्लक आहेत.
ज्यांचा येत्या काही दिवसांत पूर्ण वापर केला जाऊ शकतो. देशात आता पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या 100 कोटींच्यावर गेली असून आता दुसरा डोस देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. राज्यांना तसेच केंद्रशासित प्रदेशांना उपलब्ध करोना डोसची माहिती आधीच उपलब्ध करून देण्यात येत आहे.
त्यामुळे त्यांना त्यांच्या गरजेनुसार त्याची मागणी नोंदवणे शक्य होणार आहे. केंद्रातर्फे राज्यांना मोफत करोना लस उपलब्ध करून दिली जात असली तरी विकतची लसही मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्याने त्याचा वापर करणाऱ्यांचीही संख्या मोठी आहे. तथापि, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने अद्याप विकतची लस घेणारे किती आणि मोफतची लस घेणाऱ्यांची संख्या किती याची आकडेवारी अद्याप जाहीर केलेली नाही.