जळोची – देशातील विविध राज्यांतील खासदार हे बारामतीचा विकास पाहण्यासाठी दाखल झाले आहे. सर्वपक्षीय खासदारांनी (दि.26) राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. खासदारांचा बारामती दौरा वैयक्तिक स्वरूपाचा असल्याचे सांगण्यात आले. या खासदारांमध्ये भाजपचे 5 खासदारही उपस्थित आहेत.
बारामतीत आलेल्या खासदारांमध्ये शिवकुमार उदासी, निशिकांत दुबे, दुष्यंत सिंग, सीएम रमेश, भाजप खासदारांचा समावेश आहे. सौगता रॉय (तृणमूल कॉंग्रेस), लवू कृष्णा देवरियालू (युवजन श्रमिक), रितेश पांडे (बसपा), विवेक गुप्ता (तृणमूल कॉंग्रेस) हे इतर चार खासदार आणि काही बड्या उद्योगपतींचा समावेश आहे.
सर्व खासदारांचे सकाळी बारामती विमानतळावर आगमन झाले. एकूण 19 खास लोकांचा हा दौरा आहे. ज्यामध्ये 12 खासदार आणि काही उद्योगपतींचाही समावेश आहे. सर्व खासदार हे शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि पवार कुटुंबीय व परिसरात झालेल्या विकासकामांचा आढावा घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
सकाळी विमानतळावरून बाहेर पडल्यानंतर सर्व पाहुण्यांनी प्रथम लक्झरी बसमधून फेरेरो आंतरराष्ट्रीय चॉकलेट कंपनीला भेट दिली. यानंतर त्यांनी बारामतीत महिलांनी बांधलेल्या टेक्सटाईल पार्कला भेट दिली. यावेळी तेथील महिलांशी संवाद साधला. त्यांनी विद्या प्रतिष्ठानला भेट दिली. यावेळी शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार हे विकासकामांची माहिती देत होते.
हे 12 खासदार आणि काही खास उद्योगपती 2 दिवस पवार कुटुंबीयांचा खास पाहुणचार घेणार आहेत. रविवारी हे खासदार बारामतीला जाऊन कृषी विज्ञान केंद्राने उभारलेल्या इनक्युबेशन सेंटर, माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा आढावा घेणार आहेत.
हा वैयक्तिक दौरा असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, दौऱ्यात तृणमूल कॉंग्रेस, बसपा आणि भाजप खासदारांचाच सहभाग आहे. त्यामुळे बारामती दौऱ्याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष वेधले आहे.