लडाख : गलवान खोऱ्यात सोमवारी रात्री झालेल्या संघर्षात चीनचेही मोठे नुकसान झाले आहे. चिनी सैन्याच्या युनिटचा कमांडिंग ऑफिसर ठार झाला आहे. एएनआय वृत्तसंस्थेने हे वृत्त दिले आहे. संघर्ष झालेल्या घटनास्थळी काल रात्री चिनी हेलिकॉप्टरच्या फेऱ्या वाढल्या होत्या. त्यावरुन चीनच्या बाजूलाही मोठी जिवीतहानी झाल्याचे स्पष्ट होते.
घटनास्थळावर स्ट्रेचरवरुन चिनी सैनिकांना नेण्यात येत होते तसेच रुग्णवाहिकेच्या फेऱ्या सुद्धा सुरु होत्या असे सूत्रांनी सांगितले. या संघर्षामध्ये सहभागी असलेल्या सैनिकांनी चीनच्या बाजूलाही नुकसान झाल्याचे सांगितले. त्यांचे नेमके किती नुकसान झाले ते लगेच स्पष्ट करता येणार नाही. पण 40 पेक्षा जास्त चिनी सैनिक मारेल गेले आहेत अशी सूत्रांची माहिती आहे.
बफर झोनमध्येच गलवाण नदीच्या दक्षिण किनाऱ्यावर चिनी सैनिकांनी जेव्हा, नवीन चौकी उभारण्याचं काम सुरु केलं. त्यावरुन नव्या वादाला सुरुवात झाली असे अधिकाऱ्याने सांगितले. 16 बिहार रेजिमेंटचे कमांडिंग अधिकारी आणि त्यांच्या तुकडीने ही चौकी हटवण्यासाठी चीनच्या सैन्य अधिकाऱ्यांकडे आग्रह धरताच लगेच तणाव वाढला आणि संघर्षाची स्थिती उदभवली.