लेह मध्ये पुन्हा चीनची घुसखोरी

लेह – लेहच्या नायोमा ब्लॉक मधील चांगथांग भागात चीनने पुन्हा घुसखोरी केल्याचे उघड झाले आहे. त्या ठिकाणी दोन चिनी वाहनांमधून त्यांचे नागरीक भारतीय हद्दीत घुसले होते. या भागात गुरे चारायला आलेल्या तेथील अदिवासींना त्यांनी तेथे गुरे चरू देण्यास आक्षेप घेतल्याचेही वृत्त आहे.

तथापि स्थानिक नागरीकांनी या चिनी घुसखोरांना चांगलेच ठणकावल्यानंतर ते तेथून माघारी गेले. या भागातील एक लोकप्रतिनिधी इशे स्पालझांग यांनी सांगितले की हा प्रकार चारपाच दिवसांपुर्वी घडला आहे. इशे हे स्वायत्त लडाख हिल विकास मंडळाचे सदस्य आहेत. ते म्हणाले की स्थानिक आदिवासी या भागात नेहमी आपली गुरे चरण्यासाठी नेतात. पण काही कारणांमुळे अलिकडच्या काळात त्यांनी तेथे आपली गुरे नेली नव्हती.

तथापि अलिकडे त्यांनी पुन्हा हे काम सुरू केल्यानंतर चीनी बाजूकडून आलेल्या दोन वाहनांतील नागरीकांनी त्यांना मज्जाव केला. या चिनी नागरीकांनी आपले तंबुही उभारले होते. पण स्थानिकांनी त्यांना तसे करण्यास पुर्ण मज्जाव केला. त्यावेळी चिनी नागरीकांनी स्थानिकांना धमक्‍या दिल्या. हा सारा प्रकार वरीष्ठ सरकारी अधिकाऱ्यांना कळवण्यात आला आहे.

नागरीकांच्या आक्षेपानंतर चिनी वाहने त्यांच्या हद्दीत माघारी गेल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. या वाहनांतून जे नागरी वेषात आले होते त्यात काही चिनी सैनिकांचाही समावेश असावा अशी शंका स्थानिकांनीन व्यक्त केली आहे. या भागातील चिनी घुसखोरी ही आता नित्याची बाब झाली आहे असे काही स्थानिकांचे म्हणणे आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.