लोणी काळभोर-चायनीज खाल्ले नाही म्हणून एकास चायनीज बनवण्याच्या उलथण्याने बेदम मारहाण करण्यात आली, यामध्ये तो गंभीर जखमी झाला असून याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी अंबादास भालचंद्र काटकर (वय 33, रा. पवारवस्ती, फुरसुंगी फाटा ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राज पवार व संकेत गायकवाड (दोघे रा. कवडीपाट टोलनाका, कदमवाकवस्ती) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास कवडीपाट टोलनाका नजीक घडला आहे. काटकर हे चायनीज राईस घरी नेण्यासाठी गेले होते. तेथे योगेश लोंढे, राज पवार, संकेत गायकवाड हे होते. योगेश लोंढे हा काटकर यांना चायनिज खाऊन जा असे म्हणाला. त्यावेळी त्यांनी नकार दिला व घरी पार्सल न्यायचे आहे असे सांगितले. त्या वेळी राज पवार याने वाद घातला. तिघांत थोडी बाचाबाची झाली. त्यावेळी दोघांनीही तेथील उलथने घेऊन मारहाण केली. जमलेल्या लोकांनी काटकर यांना विश्वराज हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल केले.