माथाडी कामगारांना हमाली देण्याच्या मुद्दयावरून उद्भवला वाद
पिंपरी – नववर्षाच्या पहिल्याच दिवशी बुधवारी (दि. 1) चिंचवड स्टेशन येथील दवा बाजार येथे काही माथाडी कामगारांनी वाहतूकदारांना माल खाली करण्यासाठी हमालीचे पैसे मागितले. वाहतूकदार स्वत: माल उतरविण्याची व्यवस्था करीत असल्याने त्यांनी संबंधितांना हमाली देण्यास असमर्थता दर्शविली. पर्यायाने, माथाडी कामगारांनी त्यांना माल उतरवू दिला नाही. त्यामुळे वाहतूकदार माल घेऊन परत गेले. या वादाच्या पार्श्वभूमीवर दवा बाजारमधील व्यापाऱ्यांनी बेमुदत बंद पुकारला होता. मात्र, त्यामध्ये पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर हा बंद मागे घेण्यात आला.
चिंचवड स्टेशन येथील दवा बाजारमध्ये 60 ते 70 घाऊक औषध विक्रेते आहेत. त्यांच्यामार्फत शहरातील चिंचवड, पिंपरी, सांगवी, भोसरी, आकुर्डी, निगडी, एमआयडीसी आदी भागातील सुमारे 2 हजार ते 2 हजार 100 किरकोळ विक्रेत्यांना माल पुरविला जातो. आज सकाळी 10:30 च्या सुमारास वाहतूकदारांमार्फत औषधांचा माल दवा बाजारमध्ये आणण्यात आला होता. वाहतूकदारांकडून संबंधित माल “डोअर डिलिव्हरी’ तत्त्वावर दिला जातो. वाहतूकदारांकडूनच हा माल स्वत: खाली करून देण्याची व्यवस्था आहे. दरम्यान, आज वाहतूकदार माल खाली करून घेण्यासाठी आल्यानंतर काही माथाडी कामगारांनी त्यांना थांबविले.
माल खाली करण्यासाठी माथाडी कामगारांना पैसे द्यावे लागतील, अशी भूमिका त्यांनी घेतली. माथाडी कामगारांनी त्यांना माल खाली करू दिला नाही. त्यामुळे फुरसुंगी येथुन आलेल्या 15 ते 20 गाड्या माल खाली न करता परत गेल्या. वाहतूकदारांनी मालच न दिल्याने माल विकणार काय, असा प्रश्न औषध विक्रेत्यांसमोर निर्माण झाला. अशाप्रकारे रोजच होणाऱ्या त्रासाला कंटाळून पिंपरी-चिंचवड केमिस्ट असोसिएशनतर्फे आजपासून बेमुदत बंद पुकारला होता.
दरम्यान, याबाबत माहिती मिळाल्यानंतर निगडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील टोणपे, सहायक पोलीस निरीक्षक अन्सार शेख यांनी दवा बाजारमध्ये व्यापाऱ्यांची भेट घेतली. व्यापाऱ्यांना माल खाली करण्यासाठी त्रास दिला जात असल्यास पोलीसांकडून त्यांना आवश्यकतेनुसार बंदोबस्त दिला जाईल. औषध विक्री बंद ठेवणे हा भाग संवेदनशील आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनी पुर्ववत दुकाने सुरू करावी, असे आवाहन संबंधितांनी असोसिएशनचे अध्यक्ष संतोष खिंवसरा आणि घाऊक औषध विक्रेत्यांना केले. त्यानंतर दुपारी सव्वा एकच्या सुमारास हा बंद मागे घेण्यात आला.
चिंचवड स्टेशन दवा बाजार येथील घाऊक विक्रेत्यांना वाहतूकदारांकडून “डोअर डिलिव्हरी’ तत्त्वावर औषधांचा माल दिला जातो. आज सकाळी माल आल्यानंतर काही माथाडी कामगारांनी वाहतूकदारांकडे हमालीचे पैसे मागितले.
वाहतूकदारांकडून हा माल स्वत: खाली केला जातो. त्यांना माथाडी कामगारांना पैसे देणे परवडत नसल्याने त्यांनी त्याला नकार दिला. त्यामुळे हा माल माथाडी कामगारांनी उतरू दिला नाही. पर्यायाने, गाड्या माघारी गेल्या. त्यानंतर आम्ही बेमुदत बंद पुकारला होता. मात्र, पोलिसांनी बंदोबस्त देण्याची तयारी दर्शवित बंद मागे घेण्याचे आवाहन केले. त्यानुसार बंद मागे घेतला.
– संतोष खिंवसरा, अध्यक्ष, पिंपरी-चिंचवड केमिस्ट असोसिएशन.