तैपेई, (तैवान) – चीनकडून उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात आले असल्यामुळे तैवानने संपूर्ण देशभरात सतर्कतेचा इशारा दिला आहे. विशेषतः तैवानमध्ये शनिवारी होत असलेल्या अध्यक्षीय निवडणुकांमध्ये चीनकडून अडथळा आणला जाण्याची शक्यता असल्यामुळे तैवानच्या संरक्षण मंत्रालयाकडून नागरिकांना हा सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
चीनकडून क्षेपणास्त्र सोडली जात आहेत, असे अध्यक्षांच्या नावे नागरिकांच्या मोबाइलवर इंग्रजीतून पाठवण्यात आलेल्या संदेशामध्ये म्हटले गेले आहे. नागरिकांच्या सतर्कतेसाठी पाठवण्यात आलेल्या या संदेशाची दखल थोड्याच वेळात आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील घेतली गेली.
तैवानचे परराष्ट्र मंत्री जोसेफ वू हे एक आंतरराष्ट्रीय पत्रकार परिषदेला संबोधित करत असतानाच हा संदेश त्यांच्यापर्यंतही पोचला. मात्र त्यांनी लगेचच चीनने सोडलेले हे क्षेपणास्त्र नसून उपग्रह असल्याचे स्पष्टिकरण दिले. त्यांनी चिंता करू नका, कोणताही धोका नाही, असेही पत्रकारांना सांगितले. त्यांनी दिलेल्या या स्पष्टिकरणामुळे भर पत्रकार परिषदेत चांगलाच हशा पिकला.
चीनच्या मुख्य भूमीपासून जेमतेम १६० किलोमीटर दूर असलेल्या तैवानला चीन आपलाच भाग मानतो आहे. एक दिवस तैवानला चीनबरोबर जोडून घेतले जाईल, ही चीनची महत्वाकांक्षा आहे. मात्र चीनची ही भूमिका तैवानला अमान्य असून तैवान स्वतःला स्वतंत्र देश मानतो आहे.