बीजिंग – चीनने संरक्षण बजेट मध्ये 7.1 टक्के इतकी वाढ करून ते आता 230 अब्ज डॉलर्स इतके केले आहे. भारताच्या संरक्षण तरतूदीच्या तब्बल तिप्पट ही तरतूद आहे.
पंतप्रधान ली केकियांग यांनी नॅशनल पीपल्स कॉंग्रेसला सादर केलेल्या अर्थसंकल्पाच्या प्रस्तावांनुसार, चीन सरकारने 2022 या आर्थिक वर्षासाठी संरक्षण अर्थसंकल्प 1.45 ट्रिलियन युआन म्हणजेच सुमारे 230 अब्ज डॉलर्स इतका प्रस्तावित केला आहे, जो गेल्या वर्षाच्या तुलनेत 7.1 टक्क्यांनी वाढला आहे.
देशाच्या सार्वभौमत्व, सुरक्षा आणि विकासाच्या हिताचे रक्षण करण्यासाठी लष्करी सिद्धता वाढवणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले त्यासाठीच ही वाढीव तरतूद करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. चीन कडे सध्या लष्करात एकूण 20 लाख जवान कार्यरत आहेत. चीन कडून अंतर्गत सुरक्षेवरही मोठ्या प्रमाणात खर्च केला जातो.
शी जिनपिंग यांनी चीनची सत्ता ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी चिनी लष्कराच्या आधुनिकीकरणासाठी तसेच त्याच्या सर्वंकष सिद्धतेसाठी पहिल्यापासूनच लक्ष केंद्रीत केले आहे. नौदल आणि हवाईदलावरही ते मोठ्या प्रमाणात खर्च करीत आहेत.