नवी दिल्ली – चीनने आपल्या संरक्षण अंदाज पत्रकामध्ये ७.२ टक्क्यांनी वाढ केली असून आता चीनचे वार्षिक संरक्षण अंदाजपत्रक १.६७ लाख कोटी युआन (२३२ अब्ज डॉलर) इतके झाले आहे. चीनच्या नॅशनल पीपल्स कॉन्फरन्सच्या कालपासून सुरू झालेल्या बैठकीमध्ये चीनचे पंतप्रधान ली कियांग यांनी संरक्षण अंदाजपत्रकामधील वाढीचा प्रस्ताव ठेवला. संरक्षण क्षेत्राच्या आधुनिकीकरणाबरोबर लष्करी प्रशिक्षण आणि संरक्षण सिद्धतेवर विशेष भर दिला जाणार असल्याचेही कियांग यांनी यावेळी सांगितले.
तैवान, दक्षिण चीन समुद्र, भारताबरोबरच्या सीमा आणि अमेरिकेबरोबरची वाढत्या स्पर्धेमुळे चीनने आपल्या संरक्षण क्षेत्राचे वेगाने आधुनिकीकरण करायला सुरुवात केली आहे. जगभरात संरक्षण उद्योगावर सर्वाधिक खर्च करणारा चीन हा अमेरिकेपाठोपाठ दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. चीनचे वार्षिक संरक्षण अंदाजपत्रक २३२ अब्ज डॉलर इतके झाले आहे. तर अमेरिकेचे वार्षिक संरक्षण अंदाजपत्रक गेल्या वर्षी ८८६ अब्ज डॉलर इतके होते.
यावर्षी चीनने आपल्या संरक्षण अंदाजपत्रकात जेवढ्या प्रमाणात वाढ केली आहे, त्याच प्रमाणात गेल्या वर्षीही वाढ केली होती. गेल्या वर्षीही संरक्षण क्षेत्राच्या अंदाजपत्रकामध्ये ७.२ टक्क्यांनी वाढ करून ते १.५६ लाख कोटी युआन (२२५ अब्ज डॉलर) केले गेले होते. गेल्या वर्षीची ही वाढ चीनने संरक्षण अंदाजपत्रकामध्ये सलग आठव्या वर्षी केलेली वाढ होती.
यापूर्वीच्या संरक्षण अंदाजपत्रकांप्रमाणेच या वर्षीचे वार्षिक संरक्षण अंदाजपत्रक देखील भारताच्या संरक्षण अंदाज पत्रकाच्या तिपटीहून जास्त आहे. भारताचे यंदाचे वार्षिक संरक्षण विषयक अंदाजपत्रक ६,२१,५४१ कोटी रुपये (७४.८ अब्ज डॉलर) इतके आहे.