नवी दिल्ली : चीन बरोबर सुरु असलेल्या वादामध्ये अमेरिकेने भारताला साथ दिली आहे. पूर्व लडाखमध्ये विनाकारण तणाव निर्माण करणाऱ्या चीनला अमेरिकेने सुनावलं आहे. चीनच्या कृतीमधून त्यांचा त्रास देण्याचा हेतू दिसून येतो. दक्षिण चीनचा समुद्र असो किंवा भारतीय सीमा या चकमकींवरुन चीनपासून असलेला धोका लक्षात येतो असे अमेरिकेने म्हटले आहे. दक्षिण व मध्य आशियासाठीच्या अमेरिकेच्या वरिष्ठ राजनैतिक अधिकारी अॅलिस वेल्स यांनी ही टीका केली आहे.
दक्षिण चीनचा समुद्र असो किंवा भारतीय सीमा चीनची आक्रमकता फक्त शब्दांपुरती मर्यादीत नाही. चीनचे चिथावणीखोर आणि दुसऱ्यांना त्रासदायक ठरणारे वर्तन आपण पाहत आहोत. त्यातून चीनला आपल्या वाढत्या शक्तीचा नेमका कसा उपयोग करायचा आहे? हा प्रश्न निर्माण होतो असे अॅलिस वेल्स पत्रकारांशी बोलताना म्हणाल्या.
यापूर्वी भारत-चीनमध्ये सीमावाद झाले. त्यावेळी अमेरिकेने थेट भूमिका घेतली नव्हती. पण यावेळी अमेरिकेने चीनला थेट फटकारले आहे. यामागे करोना व्हायरस सुद्धा एक कारण आहे. कारण करोना व्हायरसमुळे अमेरिकेत चीन विरोधात मोठया प्रमाणावर संताप आहे. ट्रम्प प्रशासनाने तर या व्हायरसच्या फैलावासाठी चीनला जबाबदार धरले आहे.