बीजिंग – अंतराळामध्ये प्राण्यांच्या प्रजननाची प्रक्रिया कशा प्रकारे असते याचे संशोधन करण्याची मोहीम चीनने हाती घेतली असून त्याचा एक भाग म्हणून लवकरच काही माकडांना अंतराळात पाठवण्यात येणार आहे. अनेक वर्षापूर्वी अशाच प्रकारचा प्रयोग रशियाने उंदरांवर केला होता. आता तसाच प्रयोग चीनतर्फे माकडांबाबत केला जाणार आहे.
या प्रयोगासाठी चीनमध्ये स्पेशल स्पेस स्टेशन तयार करण्यात आले असून त्यामध्ये या माकडांना स्पेशल कॅप्सूलमध्ये ठेवले जाणार आहे त्यांच्यासोबत काही अंतराळवीरही असणार आहेत चायनीज अकॅडमी ऑफ सायन्स या संस्थेने या प्रयोगासाठी पुढाकार घेतला आहे. अंतराळात वातावरणामध्ये प्राण्यांची मानसिकता कशी असते आणि प्रजनन प्रक्रियेसाठी त्यांची तयारी कशाप्रकारे होते याचा अभ्यास या निमित्ताने केला जाणार आहे.
1979 मध्ये रशियाने अशाच प्रकारचा प्रयोग केला होता आणि काही उंदरांना अंतराळात पाठवले होते त्या प्रयोगामध्ये उंदरांना गर्भधारणा झाली होती पण हे उंदीर पृथ्वीवर आल्यावर पिलांना जन्म मात्र देऊ शकले नाहीत. चीनने मात्र या प्रयोगासाठी माकडांचा उपयोग केला आहे. कारण माणूस आणि माकडामध्ये बऱ्यापैकी साधर्म्य असल्याने हे निष्कर्ष मानवी उपयोगासाठी ही उपयुक्त ठरतील असे चीनच्या संशोधकांना वाटत आहे.
रशियाने उंदरांवर केलेल्या प्रयोगानंतर जे निष्कर्ष समोर आले होते त्याप्रमाणे अंतराळामध्ये प्राण्यांचे सेक्स हार्मोन्स कमी होतात. यापूर्वी नासानेही अंतराळात अनेक प्रकारच्या प्राण्यांची अंडी पाठवून प्रयोग केले आहेत पण जिवंत प्राण्यांना पाठवण्याचा प्रयोग रशियाच्या पाठोपाठ फक्त चीनच आता करणार आहे आणि या प्रयोगाच्या निष्कर्षाची उत्सुकता संपूर्ण वैज्ञानिक जगाला लागली आहे.