आमच्या निर्णयामुळे चीनच्या अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम
वॉशिंग्टन – चीनहून आयात केल्या जाणाऱ्या मालावर अमेरिकेने मोठ्या प्रमाणात कर आकारणी केल्याने चीनला आता आमच्याशी रितसर व्यापार करार केल्याशिवाय गत्यंतरच उरलेले नाहीं कारण आमच्या निर्णयामुळे त्यांच्या अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होंऊ लागला आहे, अनेक कंपन्या चीन सोडून अन्य देशात जायला निघाल्या आहेत असे अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी म्हटले आहे.
चीनकडून आयात केल्या जाणाऱ्या दोनशे अब्ज डॉलर्सच्या मालावर ट्रम्प यांनी 25 टक्के आयात कर लागू केला आहे. आता आणखीही 300 अब्ज डॉलर्सच्या चीनी मालावर आम्हीं 25 टक्के दरानेच कर आकारणी करणार आहोत असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. या साऱ्या प्रकारामुळे चीन चांगलाच जेरीला आला असून आमची उपाययोजना यशस्वी ठरली आहे असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार आता चीन आमच्याशी रितसर व्यापार करार करण्यास तयार होईल असे ट्रम्प यांनी आज वार्ताहरांशी बोलताना सांगितले. चीनला आमच्याशी व्यापार करार केल्याशिवाय गत्यंतरच उरले नाही असे ते म्हणाले.
चीन आणि अमेरिका यांच्यात परस्परांच्या मालावर केली जाणारी कर आकारणी यावरून गेले काही दिवस जोरदार संघर्ष सुरू आहे. ट्रम्प म्हणाले की आम्ही त्यांच्या मालावर केलेल्या 25 टक्के कर आकारणीमुळे आम्हाला आता मोठ्या प्रमाणात पैसा मिळू लागला असून त्यामुळेच आमचा जीडीपी वाढला आहे अशी टिपण्णीही ट्रम्प यांनी केली आहे.