नवी दिल्ली- केंद्रीय दक्षता आयुक्त (सीव्हीसी) म्हणून के.व्ही.चौधरी यांचा कार्यकाळ समाप्त झाला. नव्या सीव्हीसींची नियुक्ती होईपर्यंत त्या पदाचा तात्पुरता प्रभार दक्षता आयुक्त शरद कुमार यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.
केंद्रीय दक्षता आयुक्तांच्या नेतृत्वाखाली दोन दक्षता आयुक्त कार्यरत असतात. आणखी एक दक्षता आयुक्त टी.एम.भसीन यांचा कार्यकाळही नुकताच समाप्त झाला. सीव्हीसी पदाचा हंगामी प्रभार देण्यात आलेले कुमार राष्ट्रीय तपास संस्थेचे (एनआयए) माजी प्रमुख आहेत.
त्यांनी मागील वर्षी 12 जूनला दक्षता आयुक्त म्हणून कार्यभार स्वीकारला. वयाची 65 वर्षे पूर्ण होईपर्यंत म्हणजे पुढील वर्षीच्या ऑक्टोबरपर्यंत ते दक्षता आयुक्त म्हणून कार्यरत राहू शकणार आहेत. दक्षता आयोग ही भ्रष्टाचारविरोधी यंत्रणा आहे.