फुरसुंगी – मुसळधार पावसामुळे ऐतिहासिक व नागमोडी वळणाच्या दिवे घाटातील डोंगर दऱ्यांतून सर्वत्र छोटे-मोठे धबधबे व झरे खळखळू लागले आहेत तर हिरवा शालू परिधान केल्याप्रमाणे निसर्गसौंदर्याने दिवेघाट नटल्याने पर्यटकांना आकर्षित करून घेत आहे.
मुसळधार पावसामुळे हडपसर-सासवड मार्गावरील निसर्ग सौंदर्याच्या खाणीत वसलेल्या दिवे घाटातील डोंगर, दऱ्यांमधून धबधबे वाहू लागल्याने या घाटात सृष्टीने हिरवा शालूप्रमाणे विलोभनीय दृश्य निर्माण झाले आहे. परिसरातील डोंगर व पर्वतरांगा हिरवाईने नटल्या आहेत. सर्वत्र लाल, पिवळ्या, निळ्या रंगांच्या रानफुलांनी डोंगररांगा बहरून गेल्या आहेत.
सर्वत्र गर्द हिरवळ, खळखळणारे उंचच उंच नेकलेस धबधबे, पाझरणारे डोंगर, झरे यामुळे या घाटमार्गातून जाताना निरस गारवा व मनाला आल्हादायक समाधान मिळत असल्याने हा ऐतिहासिक दिवेघाट पर्यटकांना आकर्षित करत आहे. या धबधब्याखाली चिंब भिजण्याचा आनंद अनेक पर्यटक घेताना दिसत आहेत. अनेक पर्यटक या घाटातील निसर्ग व खळाळणाऱ्या धबधब्यांचा आनंद लुटताना दिसत आहेत.
मस्तानी तलाव पर्यटनस्थळ विकसित करावे
गेल्या 14 वर्षांपासून कधीही न भरलेला ऐतिहासिक मस्तानी तलाव पूर्ण क्षमतेने भरण्याच्या मार्गावर आला आहे. तरी प्रशासनाने ऐतिहासिक मस्तानी तलावाचे जतन व दुरुस्ती करून हा तलाव पर्यटनस्थळ म्हणून विकसित करावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.