काठमांडू – चीनने नेपाळला 8 दशलक्ष युआन एवढे कृषी अनुदान देण्याचे मान्य केले आहे. नेपाळच्या संसदेतील सभापती देवराज घिरीमे आणि चीनमधील सत्तारूढ कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायनाच्या पॉलिट ब्युरोचे सदस्य युआन जियाजुन यांच्यादरम्यान झालेल्या बैठकीमध्ये याबाबतचा निर्णय घेण्यात आला.
युआन तीन दिवसांच्या नेपाळ दौऱ्यावर रविवारी नेपाळमध्ये आले आहेत. त्यांच्या समवेत 26 सदस्यांचे शिष्टमंडळदेखील नेपाळ दौऱ्यावर आले आहे.
नेपाळमधील सर्व 7 प्रांतांमधील कृषी क्षेत्रासाठी चिनी अनुदान दिले जाणार आहे. नेपाळमधील विविध पायाभूत प्रकल्पांमध्ये चीनच्या वतीने मोठी गुंतवणूक करण्यात येते आहे. यामुळे या प्रकल्पांच्या उभारणीमध्ये नेपाळ चीनवर अवलंबून राहिल्यासारखे झाले आहे.
हे अनुदान आणि पायाभूत सुविधांमधील गुंतवणूक म्हणजे चीनच्या बहुचर्चित कर्जाच्या विळख्याचाच दुसरा प्रकार मानले जाते आहे. अशा कर्जाच्या विळख्यामध्ये अडकून श्रीलंका आणि पाकिस्तानसारख्या देशांची अर्थव्यवस्था पूर्णपणे डबघाईला आली आहे.