-->

चीनने पहिल्यांदाच दिली कबुली; ‘गलवान मधील चकमकीत आमचे पाच सैनिक ठार’

बिजींग- गेल्या वर्षी जून महिन्यात पुर्व लडाख मधील गलवान खोऱ्यात चीन आणि भारतीय लष्करी तुकड्यांमध्ये जोरदार संघर्ष झाला होता. त्या संघर्षात आमचे पाच जण ठार झाल्याची कबुली चीनने प्रथमच दिली आहे. या पाच जणांमध्ये पिपल्स लिबरेशन आर्मी या चिनी लष्कराचे काहीं अधिकारी आणि काहीं कर्मचारी होते.

चिनी लष्कराने म्हटले आहे की, आमच्या लष्कराचे पाच जण काराकोरमच्या पहाडी भागातील एका ठाण्यात तैनात होते. त्यावेळी त्या भागात झालेल्या चकमकीत त्यांनी देशासाठी हौतात्म्य पत्करले. या चकमकीत भारताचे वीस जवान शहीद झाले आहेत. पण चिनचे नेमके किती जण ठार झाले याची कोणतीच माहिती आजपर्यंत जाहीर झाली नव्हती. पण अखेर चीनने ही कबुली दिली आहे. चिनच्या ठार झालेल्या लष्करी कर्मचाऱ्यांमध्ये की फाबाओ नावाचा एक रेजिमेंटल कमांडरही ठार झाला आहे.

गलवान खोऱ्यात दोन्हीं देशांमधील लष्करामध्ये 5 मे रोजी संघर्ष उद्‌भवला होता. त्यानंतर त्याची व्याप्ती वाढत गेली आणि 15 जून रोजी भारताचे वीस जवान तेथे शहीद झाले. दोन्ही बाजुंच्या लष्करामध्ये इतक्‍या मोठ्या प्रमाणात प्रथमच हा संघर्ष उद्‌भवला होता. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या नेतृत्वाखालील चीनी लष्कराकडून त्यांच्या शहींद जवानांना वीर पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.

भारतीय जवानांशी झालेल्या चकमकीत 45 चिनी जवान ठार झाल्याचे वृत्त रशियन वृत्त संस्थेने दिले होते. अमेरिकन गुप्तचर संघटनांनी हा आकडा 35 इतका होता असे म्हटले होते. पण चीनकडून मात्र याचा कोणताच खुलासा करण्यात आला नव्हता. चीनी लष्कराची इतकी मोठी मनुष्य हानी झाल्याचे वृत्तही चीनकडून नंतर फेटाळण्यात आले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.