वॉशिंग्टन – अमेरिका आणि इराण यांच्यात अण्विक विषयावरून जो तीव्र वाद निर्माण झाला आहे त्याविषयी इराणशी चर्चा करण्याची आमची तयारी आहे असे अमेरिकेच्या बायडेन प्रशासनाने म्हटले आहे. इराण आणि अमेरिकेत सन 2015 साली अण्विक करार झाला होता.
पण त्यांच्यात नंतर तीव्र मतभेद निर्माण झाल्याने अमेरिका या करारातून बाहेर पडली होती. आता पुन्हा त्याविषयी समेट घडवण्यास आम्हीं तयार असल्याचे संकेत अमेरिकेने दिले आहेत. ही एक मोठी जागतिक घडामोड मानली जात आहे.
करारातील अटी पाळण्यास इराण तयार असेल तर आमची या विषयावर त्यांच्याशी पुन्हा चर्चा करण्याची तयारी आहे असे अमेरिकेने म्हटले आहे. दोन्ही देशांमध्ये ही चर्चा पुन्हा सुरू व्हावी यासाठी युरोपिय देश मध्यस्थी करण्यात तयार आहेत.
त्यासाठी युरोपिय देशांनी अमेरिकेस निमंत्रण पाठवले आहे. ते स्वीकारण्यासही अमेरिका राजी झाली आहे. संयुक्तराष्ट्रांच्या सुरक्षा समितीचे पाच सदस्य देश आणि इराण यांच्याशी संयुक्तपणे ही चर्चा होईल. त्याखेरीज जर्मनीही यात सहभागी होईल.